सातारा : शासकीय कार्यालयांमधील देव-देवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढण्याबाबत राज्य शासनाचे परिपत्रक निघाले, त्यानंतर ते मागेही घेण्यात आले. परंतु साताऱ्यातील शासकीय अधिकारी, कार्यालयांना याची पुसटशीही कल्पना नव्हती. विशेष म्हणजे, शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये ‘लक्ष्मी अन् बालाजी’च अधिक प्रसन्न असल्याचे दिसून आले. कारण, त्यांच्याच प्रतिमा मोठ्या संख्येने होत्या. भारताने धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे. त्यातून महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे ओळखले जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही धर्माचे देव-देवतांची प्रतिमा लावू नयेत, पूजा अर्चा केली जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुढे येत होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले होते. त्याद्वारे शासकीय कार्यालयांमधील देव-देवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर समाजातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी शासकीय कार्यालयातून फेरफटका मारला. त्यावेळी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना याची माहिती नसल्याचे समोर आले. पूर्वीपासून असलेले फोटो आहे तसेच दिसून आले. काही ठिकाणी तर पूजाही केली होती. (प्रतिनिधी)परिपत्रकच पोहोचलेले नव्हतेसाताऱ्यातील प्रमुख शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये फार पूर्वीपासूनच देवांच्या प्रतिमा लावलेल्या दिसतात. परिपत्रक निघण्यापूर्वी त्या होत्या. मात्र, या प्रतिमा काढावयाच्या आहेत, असे परिपत्रकच मुळात अनेक कार्यालयांपर्यंत पोहोचलेले नाही. ७ जानेवारीला ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्याने हे पत्रक काढले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हे पत्रक मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे जाहिर झाले आहे.
शासकीय कार्यालयांत लक्ष्मी अन् बालाजी प्रसन्न
By admin | Published: January 27, 2017 11:22 PM