लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : वाठार स्टेशन येथील अशोक जेबले यांचे किराणा दुकान व राहते घर फोडुन चोरट्यांनी २ लाख ६३ हजार रुपयांची रोखड व दोन किलो चांदी, पाच तोळे सोने असा एकूण ५ लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे वाठार स्टेशन परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जेबले कुटुंबीय गेली अनेक वर्षांपासून वाठार स्टेशन येथे किराणा व भुसार मालाचा व्यवसाय करीत आहेत. वाठार -वाई या मुख्य रस्त्यावर त्यांची दुमजली इमारत असुन खालच्या भागात त्यांचा किराणा व मेडिकलचा व्यवसाय आहे तर वरील मजल्यावर ते स्वत: राहत आहेत. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता त्यांनी आपले दुकान बंद केले. दिवसभरातील हिशोब करुन व्यवसायातील रोख रक्कम २ लाख ६३ हजार रुपये घरात असलेल्या जुन्या तिजोरीत ठेऊन चंद्रशेखर व विश्वेश्वर जेबले बंधू झोपण्यासाठी गेले. विश्वेश्वर जेबले यांना शनिवारी कामानिमित्त मुंबईला जायचे असल्यामुळे ते रात्री १ वाजेपर्यंत जागेच होते. पहाटे चंद्रशेखर यांची पत्निी उठल्यानंतर त्यांना घरातील तिजोरीचे दार उघडे असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी पती चंद्रशेखर यांना घडल्या प्रकाराबाबत सांगीतले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेबले यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस उपाधिक्षक प्रेरणा कट्टे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वान पथक व ठसे तज्ञांच्या सहाय्याने पाहणी केली. मात्र, चोरट्यांचा सुगावा लागला नाही. चोरट्यांनी जेबले यांच्या घरातून २ लाख ६३ हजार रुपयांची रोखड व दोन किलो चांदीसह एकूण ५ लाखांचा ऐवज लंपास केला.
घरातून पाच लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: June 12, 2017 1:14 AM