ढेबेवाडी : ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावर भूस्खलनासह जमिनी खचण्याची मालिका पाच दिवसांपासून कायम असल्याने, गावागावात भीतीचे वातावरण पसरले आहे. जितकरवाडी, मेंढ, धनावडेवाडीपाठोपाठ आता कोळेकरवाडी नजीकच्या डोंगरातही भली मोठी भेग पडून डोंगर खचला आहे. यामुळे ढेबेवाडी विभागात दरडी कोसळण्याची व जमिनी खचण्याची मालिका सुरूच आहे. या घटनेमुळे कोळेकरवाडीतील जनता भीतीच्या छायेखाली असून, प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळेकरवाडीतील आनंदा कोळेकर (भिंताडे) यांनी गावाच्या एका बाजूला शेड बांधले आहे. त्यांच्या शेडजवळच साधारण दहा फुटांवर आणि गावाच्या खालच्या बाजूने शंभर ते दीडशे फुटांवर भराडीदेवीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून गाळवाणातल्या आंब्यापर्यंत अंदाजे एक मीटर रुंद व एक मीटर खोल व तीनशे मीटर लांबीची भेग पडली. भरत कोळेकर, बबन पाटील, लक्ष्मण कोळेकर, हणमंत बा. कोळेकर, हणमंत निवृत्ती कोळेकर, रामचंद्र कोळेकर, वालूबाई कोळेकर, रघुनाथ पाटील, पांडुरंग महाडिक, वसंत कोळेकर, कृष्णत कोळेकर या शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेली आहे. गावाच्या रस्त्यापासून खाली दहा फुटांवर जमीन खोल खचली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
या घटनेची माहिती तालुका प्रशासनाला दिली आहे. या घटनेची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, आजूबाजूला घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- हणमंतराव गायकवाड, सरपंच, कोळेकरवाडी.
फोटो २७कोळेकरवाडी
कोळेकरवाडीत जमिनीला भेग गेल्यामुळे काही ठिकाणी खचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (छाया : रवींद्र माने)