सातारा : तीन भूखंड एकत्रित करण्यासाठी कऱ्हाड येथील भूमिअभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक अधिकारी आनंदराव विठ्ठल माने ( ३५, मूळ रा. निढवळ. पो वडूज, ता. खटाव) याला १३ हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदार यांना कऱ्हाड येथील तीन भूखंड एकत्रित करायच्या होत्या. त्यासाठी ते कऱ्हाड येथील भूमिअभिलेख कार्यालयात गेले. यावेळी हे काम करून देण्यासाठी आनंदराव माने याने तक्रारदाराकडे १५ हजारांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान, संबंधित तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी सापळा लावला. कऱ्हाड येथील कार्यालयातच १३ हजारांची लाच घेताना आनंदराव माने याला रंगेहात पकडण्यात आले. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली आनंदराव मानेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार भरत शिंदे, संजय साळुंखे, अजित कर्णे, विनोद राजे, संभाजी काटकर, तुषार भोसले यांनी केली.