वाई - वाई महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटामध्ये काल झालेल्या पावसाने दत्त मंदिरानजीक दुपारी चारच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बांधकाम विभागाच्यावतीने दरड हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत घाट पूर्ववत सुरू झाला होता.
मंगळवारी पडलेल्या पावसामुळे वाई महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटामध्ये दत्त मंदिरनजीक मोठी दरड कोसळली आहे. दत्त मंदिराच्या नजीक पडलेल्या दरडीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळाने एकेरी वाहतूक सुरू झाली.
सदरची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास मिळताच उपविभागीय बांधकाम अधिकारी महेश गोंजारी यांनी तातडीने पथकासह दोन जेसीबीच्या, एक डम्पर, एक ट्रॅक्टर ट्रॉली व मजुरांच्या साहाय्याने रस्त्यातील मोठमोठे दगड हलवण्यात आले. सायंकाळपर्यंत रस्त्यातील मोठमोठ्या दगडी हलविण्याचे काम सुरू होते, तर एका बाजूने वाहतूकही सुरू ठेवण्यात आली होती.
सतत पडणाऱ्या दरडींचा होणार अभ्यासपसरणी घाटामध्ये सतत पडणाऱ्या दरडींंमुळे बांधकाम विभागाच्या वतीने मुंबईतील आयआयटी टीमला घाटाचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना सुचविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार सदर टीमने नुकतीच घाटाची पाहणी केली असून, लवकरच अहवाल सादर होईल. त्यानुसार कायम स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे महेश गोंजारी यांनी दिली.