पाचगणी : पाचगणी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे वाई-पाचगणी मुख्य मार्गावर पसरणी घाटात आज, शनिवारी दुपारच्या सुमारास दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.पाचगणी व परिसरात गेली तीन दिवसांपासून पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे डोंगर रांगातून लहान मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. तर, अनेक ठिकाणी लहान मोठ्या दरडी कोसळत आहेत. त्यातच दुपारी पसरणी घाटातील दत्तमंदिरानजिक दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घाटात दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने दगडी बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली. पसरणी घाटात दरवर्षी अशा घटना घडत असुनही सार्वजनिक बांधकाम खाते कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
सातारा: पसरणी घाटात दरड कोसळली, वाहतूक काही काळ ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 6:33 PM