कुडाळ : गावातील पथदिव्यांचे वीज बिल शासनाने न भरता यासाठीचा होणारा पुरवठा बंद केला आहे. यामुळे गावातील रस्ते अंधकारमय झाले आहेत. या धोरणाविरोधात सोमवारी सरपंच परिषद जावली तालुक्याच्या वतीने पंचायत समिती, तहसील कार्यालय व वीज वितरण कार्यालय मेढा येथे सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सरपंचांनी कंदील मोर्चा काढला.
याप्रसंगी अध्यक्ष बजरंग चौधरी, महिला अध्यक्ष सरिता शेलार, पुंडलिक पार्टे, सचिन दळवी, विजय सकपाळ, संतोष शेलार, आश्विन गोळे, हणमंत बेलोशे, धनश्री शिंदे, महादेव रांजणे, तसेच विविध गावचे सरपंच उपस्थित होते.
राज्यामधील ग्रामपंचायतींचे पथदिवे वीज बिल न भरल्यामुळे बंद केली आहेत. आतापर्यंत हे सर्व बिल शासन भरत होते; परंतु अचानक शासनाने वीज बिल न भरता ते ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून भरावे, असा आदेश दिला आहे. वीज देयकासाठीच मोठ्या प्रमाणावर खर्च करून गावच्या विकासात्मक बाबींसाठी काय करायचे असा प्रश्न आहे.
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी मागण्या योग्य असून याची तातडीने माहिती वरिष्ठ पातळीवर दिली जाईल. महावीज वितरण कंपनीचे उपअभियंता सचिन बनकर यांनी लवकरच वरिष्ठ पातळीवरून यावर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
चौकट :
गावातील रस्त्यावरील पथदिव्यांची वीज बंद झाल्यामुळे जावळी तालुक्यातील दुर्गम भागातील खेडी अंधारात गेली आहेत. त्यातच पावसाळा सुरू आहे. यामुळे अंधाराचा फायदा घेत विघातक कृत्यांना खतपाणीच मिळणार आहे. गावचे विलगीकरण कक्ष अडचणीत सापडले आहे. या सर्वांची दखल घेत येत्या आठ दिवसांमध्ये गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंच परिषदेच्यावतीने देण्यात आला आहे.