वाई : वाई तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने वाई तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट आलेले नाही. डोंगर पठारावरसुद्धा याची भीषणता यावर्षी जाणवत नाही. मात्र, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून मोठ्या प्रमाणात नासाडी करताना दिसत आहेत.
अरगड ज्वारीचे कणीस खाण्यासाठी संपूर्ण ताटे जमीनदोस्त करून खात असल्याने पिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाईच्या पश्चिम भागासह संपूर्ण तालुक्यात हजारो एकर जमिनीतील अरगड ज्वारीचे रानडुक्कर व भटक्या प्राण्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे.ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल, कांदा, पावटा, वाटाणा, बाजरी यासारख्या निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना याची झळ बसत आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
शेतकरी आपल्या शेतात रानडुकरांचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविताना दिसत आहे. संपूर्ण शेताला साडीने लपेटण्यात येते. तसेच आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधण्यात येतात, थायमेट घालण्यात येते, रात्रभर शेकोटी पेटवून खडा पहारा दिला जातो. तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून पीक फस्त केले.