सातारा : जिल्ह्याला कोरोना लसीचा साठा कमी प्रमाणात येत असल्याने इच्छा असूनही अनेकांना डोस मिळेना. त्यातच रविवारी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी सकाळी ६ वाजेपासूनच रांग लागली होती; पण कूपन पद्धतीने ७०० जणांना दुसरा डोस मिळाला.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. सुरुवातीला ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ वर्षांच्या वरील कोमॉर्बिड व्यक्तींना लसीकरण सुरू झाले, तर एक महिन्यापासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करताना ४४० हून अधिक केंद्रे कार्यान्वित केली आहेत. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयासह, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातही लसीकरणाची सोय आहे. नागरिकांना लस घ्यायची आहे; पण मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला साठा मिळत नसल्याने अनेकांना पहिला डोसही घेताना वाट पाहण्याची वेळ आली आहे. त्यातच आता अनेकांची दुसऱ्या डोसची तारीख आली आहे. त्यामुळे पहिल्या, तसेच दुसऱ्या डोससाठीही रांगा लागत आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी सकाळी ६ वाजेपासूनच नागरिक कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठी येत होते. सकाळी ९ वाजेपर्यंत लांबच लांब रांग लागली होती; पण जिल्हा रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे कूपन पद्धतीने ७०० नागरिकांनाच कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला. त्यामुळे अनेकांना हेलपाटा झाला.
फोटो दि.१६ सातारा कोरोना लस फोटो...
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयसमोर कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठी मोठी रांग लागली होती. (छाया : जावेद खान)
......................................................