सागर चव्हाण
पेट्री
कुसुंबीमुरा (ता.जावली ) येथील दिवंगत कोंडिबा रासो चिकणे यांची सलग चौथी पिढी गेली ९६ वर्षे पर्यावरणाचा समतोल राखत वृक्षसंवर्धन करत आहे. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन पाहता चिकणे कुटुंबीयांचे अपार निसर्गप्रेम पहावयास मिळते. एकीकडे यापूर्वी बहुतांशी ठिकाणी विघ्नसंतुष्टांकडून वणवे लावल्याने मोठ्या प्रमाणावर प्राणीसंपदा, वनसंपदेची हानी झाली. तर दुसरीकडे चिकणे कुटुंबीय हजारो वृक्ष जिवापाड जपत आहेत. विशेषतः आज अखेर एवढ्या मोठ्या परिसरात वणवा लागू दिला नाही की काडी तोडूदेखील दिली नसल्याने पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत वन्यजीवांसाठी जलसंजीवन ठरत आहे.
दिवंगत कोंडिबा रासो चिकणे यांनी १९२५ मध्ये अवघ्या २५ रुपयांत २ हेक्टर १३ गुठ्यांचा परिसर खरेदी करून परिसरात जेवढी झाडेझुडपे,वृक्ष होते ते आजदेखील चिकणे कुटुंबांच्या सलग चौथ्या पिढीपर्यंत होत असलेल्या वृक्षसंवर्धनामुळे सुस्थितीत आहेत. सलग ९६ वर्षे येथील वृक्षसंपदा संवर्धित करून त्यात आणखी वाढ होण्यासाठी पावसाळ्यापूर्वी इतर वृक्षांच्या बिया रुजविण्याचे प्रयत्न दरवर्षी त्यांच्याकडून होत असल्याने परिसर दिवसेंदिवस हिरवाईने समृद्ध होत आहे. उन्हाळ्यात ठिकठिकाणचा भकासपणा त्यात चिकणे कुटुंबाने संवर्धित करून वाढविलेली दाट हिरवीगार झाडी पाहता या कुटुंबाचे निसर्गप्रेम, पर्यावरणप्रेम दिसते. चिकणे यांची बहीण दिवंगत आबई चिकणे यांच्या आवाजाने कोणी व्यक्तीने परिसरात वृक्षतोडीचा प्रयत्न केल्यास जागीच कोयता टाकून पळ काढे. म्हणून, त्यांच्या नावाने पूर्णत: डोंगर उतारावरचा हा परिसर आबईचा मैल या नावाने सर्वपरिचित आहे.
या परिसरात जांभूळ, हिरडी, रामेटा, आंबा, गेळी, कुंभळा, चिवा, कडिपत्ता, शिकेकाई अशा अनेक जंगली औषधी तीन ते पाच हजार वनस्पतींचा समावेश आहे. यंदा जांभळीच्या शेकडो बिया रुजविण्याचा त्यांचा मानस आहे.
चौकट
वणव्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही
वणवा लागल्याने जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया मंदावते. त्यामुळे परिसरातील विहिरी ,नाले, नद्या, झरे, कुपनलिका यासारखे जलस्रोत कोरडे पडून आटू शकतात. आबईचा मैल परिसरात कधीच वणवा न लागल्याने कडक उन्हाळ्यातही झऱ्याचे पाणी टिकून राहते.
कोट
आबईचा मैल क्षेत्रात लांडोर, ससा, बिबट्या, रानडुक्कर, भेकर, मोर यासारख्या वन्य पशुपक्ष्यांचा वावर आहे. चिकणे कुटुंबाकडून आतापर्यंत ९६ वर्षे होणारे वृक्षसंवर्धन पाहता कोंडिबा चिकणे, त्यांची बहीण आबई चिकणे यांनी या परिसराची खूप काळजी घेऊन चुलती लक्ष्मीबाई चिकणे, वडील तात्याबा चिकणे, दोन मुले रमेश चिकणे, पांडुरंग चिकणे या तीन पिढ्यांसह चौथी पिढीदेखील खूप परिश्रम घेत आहे.
रमेश चिकणे - निसर्गप्रेमी, कुसुंबीमुरा