आॅनलाईन लोकमतआदर्की , दि. २0 : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आठवण जागविणारे आदर्की बुद्रुक येथील पिकअप शेड सध्या समस्यांचे आगार बनले आहे. उन्हाळा असो की पावसाळा येथील समस्या कायम असून यामुळे प्रवासी व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना आखावी, अशी मागणी होत आहे.फलटण-सातारा मार्गावर असलेले आदर्की बुद्रुक गाव पश्चीम भागातील महत्वाचे गाव आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी या ठिकाणी तब्बल ५० वर्षांपूर्वी पिकअप शेड उभारण्यात आले. तसेच पाहिले तर या पिकअप शेडला महत्व प्राप्त झाले आहे. त्याला कारणही तसेच आहे. त्याकाळी आदर्की बुद्रुक येथील बाबासाहेब धुमाळ यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण याठिकाणी आले होते. यावेळी फलटणवरून चिमणराव कदम येणार म्हणून यशवंतराव चव्हाण याच पिकअप शेडमध्ये त्यांची वाट पाहत बसले होते. या जुन्या आठवणी जागविणारे हे पिकअप शेड सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. पिकअप शेडची दुरवस्था झाली असून काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या पिकअप शेडमध्ये पाण्याचे तळे साचले होते. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी निर्माण झाल्या. आदर्की बुद्रुक येथे सर्व विभागाची कार्यालये व आठवडा बाजार भरत असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते.
उपाययोजनेची मागणी
पिकअप शेडच्या लाकडी खिडक्या तुटल्या आहेत. भिंतीही धोकादायक झाल्या आहेत. पिक-शेड समोरील रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे वाहत जाणारे पाणी शेडमध्ये येत आहे. त्यामुळे प्रवाशांना पिकअप शेडमध्ये बसता येत नाही. या पिकअप शेडची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.