रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथील सोनारसिध्द मंदिर परिसरातील धोम डावा कालव्यावरील वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पुलाच्या खालील स्लॅबच्या लोखंडी सळ्या तुटल्या आहेत. खचलेला पूल पूर्णपणे जीर्ण झालेला असून, पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरीही गेले वर्षभर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
साप येथील डोंगराकडे जाणाऱ्या सोनारसिद्ध मंदिर परिसरातील पावक्ता नावाच्या शिवारातील धोम डाव्या कालव्यावरील महत्त्वाचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. गेले वर्षभर अनेकदा वरुनच हा पूल खचत होता. परंतु या रस्त्यावरून ये-जा करणारे शेतकरी तात्पुरता मुरुमाचा भराव टाकून वाहतुकीची गैरसोय दूर करत होते. पाटबंधारे विभागाकडून गेली दोन वर्षे धोम डाव्या कालव्यावरील इतर ठिकाणचे दुरूस्तीचे काम सुरू आहे. कालवा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या या पुलाची पाहणी करून तातडीने नवीन पूल उभारावा, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे आरोप शेतकरी करत आहेत.
या धोकादायक पुलावरूनच दररोज उसाने भरलेली वाहने ये-जा करतात. शेतीमालाची वाहतूक याच रस्त्यावरून नेहमी होत असते. अचानक पूल काेसळल्यास आर्थिक नुकसानीबरोबरच वाहनधारकांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. धोम डावा कालव्याला पाणी येण्याअगोदर या पुलाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी आल्यानंतर पूल कोसळल्यास इतर ठिकाणी कालवा फुटून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. २०१८ मधील मे महिन्यामध्ये साप येथीलच धनगर शेत नावाच्या शिवारातील ओढ्यावरील पूल कालव्याला पाणी आल्यानंतर फुटला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते, तसेच मोठे नुकसानही झाले हाेते. पाटबंधारे विभागाकडून कालव्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच वारंवार कालवा फुटीच्या घटना घडत आहेत. तरी तातडीने धोकादायक पुलाच्या ठिकाणी नवीन व दर्जेदार पुलाची उभारणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
चौकट :
... म्हणे दोन दिवसांत काम सुरू करणार
पाटबंधारे विभागाच्या शाखा क्रमांक तीनचे शाखा अभियंता बी. आर. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, धोम डावा कालव्यावरील धोकादायक असलेल्या पुलाच्या उभारणीला येत्या दोन-तीन दिवसांत सुरुवात करणार असल्याची माहिती दिली. परंतु गेले वर्षभर धोकादायक स्थितीत असलेल्या पुलावरून शेतकऱ्यांची ये- जा सुरू असताना अभियंता गप्प का होते? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
फोटो : साप (ता. कोरेगाव) येथील धोम डावा कालव्यावरील धोकादायक पुलाच्या स्लॅबच्या लोखंडी सळ्या तुटल्या आहेत.
( छाया : जयदीप जाधव)