लोणंद : तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री दादासाहेब खेडकर यांच्या प्रयत्नातून सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ लोणंदकरांची तृष्णा भागवणारी पाण्याची टाकी गंजल्यामुळे पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. टाकीवर हातोड्याचे घाव बसल्यावर ज्येष्ठांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कडक उन्हापासून संरक्षण देणारी ही टाकी आता इतिहास जमा होत असल्याने अनेकांनी तिची अखेरची छबी कॅमेºयात कैद केली.
लोणंदकरांची १९६५ पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी मोठी फरफट होत होती. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना शिरवळ रोड येथील ओढ्यावरून तसेच गावालगतच्या आडावरून पाणी आणावे लागत असे. त्याकाळी लोणंदमध्ये काही पैसेवाल्यांसाठी व हॉटेल व्यावसायायिकांसाठी चार आण्याला एक छकडा पाणी घरपोच मिळत असे. लोणंदकरांचे हे पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता त्यावेळचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोणंदचे तत्कालीन सरपंच बापूसाहेब खरात व नानासाहेब भंडलकर यांचे सहकारी मित्र महादेव शंकर डोईफोडे, हरुणशेठ कच्छी, म. ह. बागवान, दगडू सखाराम क्षीरसागर, कृष्णा म्हेत्रे यांनी लोणंद ग्रामपंचायतीची त्यावेळची ८० हजार रुपये शिल्लक या पाण्याच्या टाकीसाठी शासनास वर्ग करून साडेसात लाख रुपयांची पाणी पुरवठा स्कीम त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ग्रामविकास मंत्री दादासाहेब खेडकर यांच्याकडून अथक परिश्रमातून मंजूर करून घेतली.
१९६३ मध्ये या टाकीचे भूमिपूजन झाले. टाकीचे बांधकाम सुरू असतानाच नीरा येथे फिल्टर प्लँट बसविण्यात येऊन नीरा ते लोणंद अशी सात किलोमीटर नऊ इंची लोखंडी पाईपलाईनचे कामही करण्यात आले. त्यावेळी महाराष्टÑातील ग्रामीण भागातील ही सर्वात मोठी पाणी पुरवठा स्कीम होती. १९६५ मध्ये या तीन लाख लिटरच्या जलकुंभाचे उद्घाटन झाले. १९६५ पासून निरंतर या जलकुंभातून लोणंदकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविली जात होती. पंधरा वर्षांपूर्वी लोणंदकरांना या टाकीतील पाणी पुरवठा कमी पडल्याने गोटेमाळ येथे नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र मागील महिन्यापर्यंत या पाण्याच्या टाकीचा उपयोग लोणंदकरांना झाला आहे...अनेकांचे बालपण टाकीच्या सावलीतगेली पन्नास वर्षे निरंतर ज्या टाकीने लोणंदकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविली आहे. मात्र या टाकीचा रेलिंगचा काही भागातील लोखंड गंजल्याने या टाकीला धोकादायक ठरविण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून या टाकीला पाडण्याचे काम सुरू करण्यात आले असून, प्रथम टाकीच्या वरचा भाग तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र टाकीवर जसे हातोड्याचे घाव बसत आहेत, तसे लोणंदचे ज्येष्ठ नागरिक मात्र हळहळ व्यक्त करीत आहेत. अनेकांनी या टाकीच्या सावलीत आपले बालपण घालविले असून, आज ते आपल्या नातंवडांना मोठ्या अभिमानाने या टाकीचा इतिहास सांगत आहेत.
लोणंद येथील १९६५ ची पाण्याची टाकी आणि लोणंद ग्रामपंचायत लोणंदची स्मारके आहेत. त्याकाळी बापूसाहेब खरात, नानासाहेब भंडलकर, महादेव डोईफोडे यांनी लोणंदचा पुढील पन्नास वर्षांचा विचार करून या दोन्ही वास्तू उभ्या केल्या होत्या; मात्र आज त्यातील ही पाण्याची टाकी पाडताना पाहून दु:ख होत आहे. ग्रामपंचायतीने बांधलेल्या टाकीचा भाग निखळला आहे.- नंदकुमार खरात१९६५ मध्ये मी हायस्कूलला जाता-येता आणि सुटीच्या दिवशी गावात पाणी येणार म्हणून मोठ्या कुतूहलाने या टाकीचे बांधकाम पाहत असायचो. स्लॅबला लागणारे मटेरियल एका तारेच्या साह्याने ट्रॉलीद्वारे वर जात होते. एके दिवशी मी आणि माझा मित्र दोघे त्या ट्रॉलीत बसून वर गेलो होतो. जवळपास अर्धशतक या टाकीने लोणंदकरांची पाण्याची तहान भागवली आहे.- अरुण बापू गालिदे, लोणंद