लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : संचारबंदी व मजुरांची कमतरता अशा अडचणीतून मार्गक्रमण करत तब्बल सहा महिन्यांनंतर कास धरणाचे काम शुक्रवारी थांबले. पावसाळ्यानंतर उर्वरित कामे मार्गी लावून पुढील वर्षी धरणात जलसंचय करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. असे झाल्यास सातारकरांची ही शेवटची पाणीटंचाई असणार आहे.
केंद्र शासनाच्या सुजल निर्मल योजनेंतर्गत कास धरणासाठी ४२ कोटी ८९ लाख इतक्या रकमेला मार्च २०११ मध्ये राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. कामाचा वाढता कालावधी तसेच नवीन रस्ता, जमिनीचे संपादन यासह इतर कामे वाढल्याने हा प्रकल्प तब्बल ११३ कोटींवर पोहोचला होता; परंतु शासनाने धरणातून इतर कामांना वगळले असून, धरणाच्या नवीन ९५ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
गतवर्षी निधीचा अडसर निर्माण झाल्याने धरणाचे काम उशिरा सुरू झाले. फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत जवळपास दीड महिनाच काम सुरू होते. यानंतर कोरोनामुळे या कामाला ब्रेक लागला. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने धरणाचे काम पुन्हा गतीने सुरू झाले. डिसेंबर २०२० ते २५ मे २०२१ असे एकूण सहा महिने धरणाचे काम चालले. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागल्याने परराज्यातील कर्मचारी घराकडे परतले व जलसंपदा विभागाला मजुरांची कमतरता भासू लागली. याशिवाय पावसाळादेखील तोंडावर आला आहे. त्यामुळे २५ मेपासून धरणाचे काम पूर्णतः थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस धरणाच्या उर्वरित कामास जलसंपदा विभागाकडून प्रारंभ केला जाणार आहे. धरणाचे काम मार्गी लागल्यानंतर आज उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यात तब्बल पाचपटीने वाढ होणार आहे. धरणात पुढच्या वर्षी पाणीसाठा झाल्यास सातारकरांचा पाणीप्रश्न हा कायमचा मार्गी लागणार आहे.
(चौकट)
यंदा झालेली कामे
शासनाकडून वेळेत निधी न मिळाल्याने धरणाचे काम गतवर्षी दीड ते दोन महिनेच चालले. यानंतर मात्र कामाने गती घेतली. यंदाच्या वर्षी मुख्य सांडव्याची खुदाई, सांडव्याचे संधानक (कॉंक्रीटीकरण) तसेच त्याच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले. याशिवाय मुख्य विहिरीचे पाणी सोडण्याचे सेवा द्वार व आपत्कालीन द्वार याचेदेखील काम पूर्ण झाले आहे.
(चौकट)
पुढील टप्प्यात होणारी कामे
जलसंपदा विभागाने पावसाळा संपल्यानंतर धरणाचे उर्वरित काम हाती घेण्याचे नियोजन केले आहे. काम सुरू झाल्यानंतर जुन्या सांडव्यामधील घळभरणी केली जाणार आहे. घळभरणीचे माती काम एक लाख घनमीटर इतके आहे, तर सांडवा व पुच्छ कालव्याच्या संधानकाचे काम केले जाणार असून, एकूण काम दहा हजार घनमीटर इतके आहे.
(चौकट)
पुलाचे कामही थांबणार
कास धरणाजवळील सातारा-बामणोली मार्गावरील पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. हे कामदेखील सध्या प्रगतिपथावर आहे. मान्सूनची परिस्थिती पाहता येत्या आठ दिवसात हे कामदेखील काही कालावधीसाठी बंद ठेवले जाणार आहे.
(पॉइंटर)
- जुन्या धरणाची उंची १७.१९ मीटर
- होणारी वाढ १२.४२ मीटर
- नव्या धरणाची उंची २९.६१ मीटर
- जुन्या धरणाची लांबी २१८.८५ मीटर
- नवीन धरणाची लांबी ५८०.५० मीटर
- धरणाचा सध्याचा पाणीसाठा १०७ दशलक्ष घनफूट
- नवीन धरणाचा पाणीसाठा ५०० दशलक्ष घनफूट
फोटो : मेल