सातारा : वरुणराजाने जिल्ह्यावर अवकृपा दाखविल्याने साऱ्यांचीच चिंता वाढवली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोयना धरणात गेल्यावर्षी ९ जुलै रोजी ४६.३० टीएमसी पाणी होते. तेच यंदा अवघे १९.९१ टीएमसी आहे. पावसाने लहरीपणा असाच कायम ठेवला तर काळजी आणखी वाढणार आहे.साताऱ्यातील नागरिकांनी दरवर्षीपेक्षा यंदा दुष्काळाच्या झळा जास्तच सहन केल्या आहेत. शहरातील अनेकांच्या कूपनलिकांचे पाणी आटले होते. शहराला कास आणि महादरे तलावातून पाणीपुरवठा केला जात असला तरी पाणीकपातीची वेळ सातारकरांवर आली होती. त्याचप्रमाणे शहरालगतच्या नागरिकांना पाण्यासाठी सार्वजनिक कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत होता. अनेक भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. हवामान खात्याने भर उन्हाळ्यात राज्यातील जनतेला पावसाची ‘गुडन्यूज’ दिली होती. यंदा वेळेपेक्षा लवकर आणि प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविली होती. त्यामुळे कधी पाऊस येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा प्रशासनानेही ७ जूनपर्यंत पाऊस पडेल या भरवशावर जिल्ह्यातील डोंगरांवर वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर केली होती; पण पावसाने लहरीपणा दाखविलाच. जून महिना पूर्ण कोरडा गेला. कसलाही पाऊस न पडल्याने लोकांची पाण्यासाठीची धावाधाव जूनमध्येही सुरूच होती. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पावसाने स्वत:चे अस्तित्व दाखविले. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना पाणलोट क्षेत्रांत मुसळदार पावसाने लावून धरली. त्यामुळे दोन दिवसांनंतर धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली. सुरुवातीचे काही दिवस कोयना धरणात दोन टीएमसीने वाढ होत होती. त्यानंतर ८ जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी झाले अन् धरणांतील पाण्याची आवक मंदावली. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले. एवढेच काय ती आजवरची सुखद बातमी आहे. (प्रतिनिधी)वरुन जलधारा; पाण्यासाठी रांगासातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला तरी पाणीपातळी वाढली नव्हती. त्यामुळे भर पावसात पाण्यासाठी कूपनलिकांवर रांगा लागलेल्या पाहण्यास मिळत होत्या.
गेल्यावर्षीपेक्षा धरणे निम्मीच!
By admin | Published: July 10, 2016 12:58 AM