सातारा : कधी कलाकारांचे आवाज काढून, कधी विनोद, गमती-जमती सांगून तर कधी माणसांच्या स्वभावाचे वर्णन करून हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी कॉमेडी शो ‘हास्यसम्राट’ कार्यक्रमात हास्याचा कल्लोळ निर्माण केला. सुमारे तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाला शिक्षकांनीही तितकाच प्रतिसाद दिला. त्यामुळे कार्यक्रम आणखी उंचीवर गेला.येथील शाहू कला मंदिरमध्ये ज्ञानदानासारख्या पवित्र कार्यात विद्यार्थी घडविणाऱ्या गुरूजनांसाठी ‘लोकमत’ने प्रा. दीपक देशपांडे यांचा कॉमेडी शो ‘हास्यसम्राट’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, अवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे, विस्तारअधिकारी एस. के. देशमाने, रूपेश लाहोटी, अमित बोडके, वसंत जोशी, जी. एस. देवकर, रियाज शेख, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मंगेश मुंद्रावळे, विश्वनाथ गायकवाड, संजय जाधव, नितीन गाडेकर, श्रीमंत शेळके, डॉ. महामुनी, सोनाली जाधव, संचिता तरडे आदी उपस्थित होते.सुमारे तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमात हास्याचेच फवारे उडाले. त्यामुळे उपस्थित सर्वजण सर्व ताणतणाव दूर ठेवून कार्यक्रमात रंगून गेले. प्रा. देशपांडे यांचा साताऱ्यात झालेला हा आतापर्यंतचा १२२८ वा कार्यक्रम होता. त्यांनी सुरुवातीलाच माझे कार्यक्रम हे लंडन, वॉशिंगटन, दुबई, दिल्ली, दुबई अशा छोट्या शहरांत झाल्याचे सांगून हास्यकल्लोळास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विविध आवाज व विनोद सांगून कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. बसस्थानकावरील कंट्रोलरचा आवाज, डॉक्टरांची भाषा याचे हुबेहूब आवाज काढून सर्वांनाच हसविले. मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या आवाजाला तर टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला. यावेळी जणू काही आपण निळू फुले यांचा चित्रपट पाहत आहोत की काय, असे सर्वांनाच वाटून गेले. अभिनेते सूर्यकांत यांचाही आवाज त्यांनी काढला. हा आवाजही सर्वांनाच आवडला. कन्नड चित्रपटातात बोलतात कसे हे देशपांडे यांनी सांगितले. त्यालाही उपस्थितांचा प्रतिसाद मिळाला. आकाशवाणी केंद्रावरील आवाज तसेच ‘आपकी पसंद’ कार्यक्रमात आपल्या आवडीचे गीत सांगण्यासाठी फोन केल्यावर होणारी विचारपूस व गंमत-जंमत त्यांनी सांगून हास्याचा सागर निर्माण केला.कानडी, तेलगू मिश्रित मराठीमुळे होणारी शब्दांची फेकही प्रा. देशपांडे यांनी सांगितली. तेलगू बोलताना ‘थ’ चं त आणि ‘ध’चं द कसं होतं ते विविध संवादातून सादर केले. गाव बदललं की भाषा बदलते, असे सांगून त्यांनी लातूर, कोल्हापूर तसेच पुणे येथील नागरिकांच्या स्वभावाचे नमुने पेश केले. या कार्यक्रमाचे सहप्रायोजकत्व मुंद्रावळे क्लासेस, पंकज क्रिएशन्स, देवकर क्लासेस, स्मार्ट किडस्, अॅबॅकस सेंटर (कर्मवीर कोचिंग क्लासेस), चंद्रविलास भुवन, होम रिवाईज, सोनी कस्टम्स अॅण्ड वॉचेस, प्रकृती जियो फ्रेश यांनी स्वीकारले होते. (प्रतिनिधी)
शिक्षकवृंदामध्ये ‘हास्याचा कल्लोळ !’
By admin | Published: July 06, 2014 11:07 PM