महाबळेश्वर : ‘अलीकडे नागरिक आरोग्यवर्धक गोष्टींचा स्वीकार करू लागले आहेत. म्हणूनच यापुढे शालेय पोषण आहारात मधाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे झाल्यास मुलांचे आरोग्य सुधारेल, शिवाय मधमाशी पालन करणाऱ्यांना रोजगारदेखील मिळेल. जिल्हा नियोजन समिती, महिला व बालकल्याण विभागाने या गोष्टींचा जरूर विचार करावा’, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावाची देशातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ सोमवारी मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार मकरंद पाटील, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा, उद्योग विभागाचे अप्पर सचिव बलदेव सिंह, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, मांघरच्या सरपंच यशोदा जाधव आदी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘मधमाश्यांची संख्या ३० टक्के कमी झाली आहे. ही खरोखर मानवासाठी धोक्याची सूचना आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर याला कारणीभूत आहे. यासाठी एका बाजूला रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे व दुसरीकडे मधमाश्यांची संख्या कशी वाढविता येईल, याचा संशोधकांनी विचार करायला हवा.खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी सूत्रसंचालन केले. महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी आभार मानले.विमानतळांवर खादी ग्रामोद्योगचे दालन : तटकरेदेशातील सर्वच विमानतळांवर खादी व ग्रामोद्योगचे दालन असावे. या दालनात ग्रामीण भागातील मधासह खादीची सर्व उत्पादने विक्रीस ठेवावी. देश-विदेशातून आलेला पर्यटक या दालनाच्या माध्यामातून खरेदी करेल व आपल्याला नवी बाजारपेठ मिळेल. येथील नॉर्थकोट पॉइंटच्या विकासासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून दिला जाईल’, असे आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी दिले.रोगांवर संशोधनाची गरज : मकरंद पाटीलदेशातील पहिले मधाचे गाव म्हणून मांघर या गावाची निवड झाल्याने महाबळेश्वरकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. सध्या मधाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मधमाश्यांवरील रोगावर संशोधन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केली.