कऱ्हाड : जिल्हा आरोग्य विभागाकडून सूरू असलेल्या वैक्सीन ऑन व्हील उपक्रमाअंतर्गत दोन लसीकरण व्हॅन कऱ्हाड शहर व तालुक्यासाठी दाखल झाल्या असुन लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, तहसिलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल कोरबु आदी उपस्थित होते. शहरातील बुधवार पेठ व तालुक्यातील कोळे येथे लसीकरण सूरू करण्यात आले. यासाठी ३ हजार ६४० डोस उपलब्ध करण्यात आले आहेत.शहरासह ग्रामीण भागात ज्यांच्याकडे ओळखीचा पूरावा नाही असे व दूर्गम, वाड्या-वस्तीसह वंचित, वीटभट्टी कामगार, भंगार गोळा करणारे, झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी ह्यव्हॅक्सीन आॅन व्हीलह्ण या उपक्रमातून लसीकरण करण्यात येणार असुन याचा लाभ सबंधित घटकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गावापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील वाडी-वस्तीवर ही रुग्णवाहिका जाणार असून तेथील ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दिशानिर्देश देण्यात आले आहेत.शहरातील नागरी आरोग्य केंद्राच्या मदतीने बुधवार पेठेसह झोपडपट्टीतील नागरिकांचे तसेच कोळे येथे रस्त्याकडेला वास्तव्यास असणाऱ्या भंगार गोळा करणाऱ्या कुटूंबातील सदस्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत एखाद्याकडे ओळखीचा कोणताही पूरावा नसला तरी त्याचे लसीकरण करण्यात येत आहे.
कोळे येथे एकाच ठिकाणी सुमारे शंभरजण वास्तव्यास असल्याने याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने लसीकरण करण्यात आले. जिल्हा समन्वयक इरशाद तांबोळी यांच्यासह डॉ. विना काकडे, डॉ. मेघा अनूगडे, डॉ. खबाले यांच्यासमवेत पारिचारिका, आरोग्य सेविका व मदतनीस या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.