सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकऱ्यांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. ‘लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेऊन पोलिसांनी गुरुवारी रात्री पावणेदोन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटकही केली.
जितेंद्र भोसले (रा. रेवंडे, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर परळी खोऱ्यातील रेवंडे परिसरात घडलेल्या या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले. तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी सुनावल्यानंतर रेवंडे येथे बुधवारी दुपारी अधिकाऱ्यांची टीम तत्काळ दाखल झाली. गावकऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर काहींना सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरा त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर जितेंद्र भोसले (रा. रेवंडे, ता. सातारा) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वत: तक्रार दाखल केली आहे.