वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील निवडणूक रिंगणातील ६१ ग्रामपंचायतींपैकी १४ गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित ४७ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमाने सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. पक्षीय राजकारण ग्रामपंचायतस्तरावर केले जात नसल्याच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गटबांधणीसाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.माण तालुक्यात ९५ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ६१ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यापैकी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या अनेक ग्रामपंचायती असून एकूण ४७ गावांच्या निवडणुका लागल्या आहेत. राजकीयदृष्टीने निम्मा तालुका आपल्या वर्चस्वाखाली असला पाहिजे, या भावनेतून सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे.
कोणता पक्ष-पार्टी या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारणार? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. पूर्वी गावातील गटा-तटाच्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अलीकडच्या काळात पक्षीय राजकारण शिरल्याचे निदर्शनास येत आहे.
आपल्या विचारांंच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, गाव ताब्यात असल्याने विकासकामाच्या निमित्ताने लोकांशी चांगला संपर्क राहतो. आपल्या विचारांचे कार्यकर्ते, आपला गट मजबूत होतो. त्यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुका सोप्या होऊन जातात. या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्षातील मुख्य नेतेमंडळी ग्रामपंचायत निवडणुकीत आपापल्या कार्यकर्त्यांना राजकीय बळ देताना दिसत आहेत.बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार केला असता, ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीला गांभीर्याने घेत असल्याचे दिसत आहेत.गट मजबूत करण्यासाठी नेतेमंडळी सरसावलेमाण तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी तपासली असता काही ग्रामपंचायतींवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. तर काही ग्रामपंचायतींवर भाजपा आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे, अनिल देसाई यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आपापला गट मजबूत करण्यासाठी नेतेमंडळी सरसावले आहेत. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे