मायणी : मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून मराठा समाजातील प्रत्येक घटकावर अन्याय केला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ गुंडेवाडी (मराठानगर) ता. खटाव येथील ग्रामस्थ यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असून, कोणत्याही नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा गुंडेवाडीचे सरपंच शरद निकम यांनी दिला आहे.
निकम म्हणाले, ‘आतापर्यंत सर्वांनीच मराठा समाजाला केवळ टोलवत ठेवले. समाजाने आतापर्यंत अभूतपूर्व मोर्चे काढले, आंदोलने केली, त्यामध्ये अनेक मराठा बांधव हुतात्मा झाले, तरीही समाजाच्या भावनांचा विचार न्यायव्यवस्थेने केला नाही, याचे आश्चर्य वाटते. आरक्षणाच्या बाजूने जोपर्यंत निर्णय येत नाही, तोपर्यंत मराठानगर ग्रामस्थ सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहोत. त्याचप्रमाणे कोणत्याही राजकीय नेत्यास गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
त्यासाठी सर्वांनीच सर्व प्रकारचे गट-तट, मतभेद विसरून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायलाच पाहिजे. गरज पडल्यास विशेष अधिवेशन बोलवावे. तसे पाहता न्यायव्यवस्था ही पंतप्रधानांच्या हातातच आहे. त्यांनी न्याय द्यायला हवा होता. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होणार आहेत. कोणत्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची आरक्षणाची मागणी होती. तरीसुद्धा न्यायालयाने त्याकडे डोळेझाक केली. झोपेत निर्णय दिला की काय? अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सरपंच पूनम दादासाहेब निकम यांनी व्यक्त केली.