मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेती पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा आशिया खंडातील मोठा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा व ११० मीटर उंचीवर जलसेतू येरळा नदीवर चितळे येथे बांधण्यात आला आहे.या ठिकाणाहून सांगली जिल्ह्यात टेंभू योजनेचे पाणी जाते. खानापूर तालुक्यातील माहुली येथून टप्पा क्रमांक तीनमधून पाणी सोलापूर जिल्ह्यास जाते. येरळा नदीवरील टेंभू पाठाच्या पुलाला चितळी येथे गळती लागली आहे. यात पंधरा अश्वशक्ती मोटारीपेक्षा अधिक वेगाने पाण्याची गळती सुरू आहे. या गळतीमुळे पाण्याचा मोठा झरा पुलाखालून वाहताना दिसत आहे.टेंभूच्या पुलाचे चाळीस गाळे असून, त्यातील गाळा नंबर ३१ या ठिकाणाहून पाणी गळती सुरू आहे. त्या ठिकाणच्या गाळ्यातील जोडाच्या ठिकाणची रबरी पाईप उचकटल्याने गळती होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.टेंभूचे पाणी दोन-तीन दिवसांपासून सुरू झाले.आटपाडी सांगोलाकडे हे पाणी पोहोचणार आहे. चितळी हद्दीत येरळा नदीवरील बंदिस्त पुलाच्या गाळा नंबर ३१ येथून सुरुवातीला पाण्याची थोडी गळती सुरू झाली होती. गळतीचे प्रमाण दोन दिवसांत दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातून पंधरा अश्वशक्तीच्या मोटारी एवढे पाणी गळती होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ३१ नंबर गाळ्याला भगदाड पडून आटपाडी सांगोलाकडे जाणारे पाणी थांबू शकते. तसेच मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.अधिकारी फिरकलेच नाहीतगळतीमुळे पाण्याचा मोठा झरा पुलाखालून वाहताना दिसत आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी अद्याप या ठिकाणी फिरकले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
चितळीत टेंभू जलसेतूला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:55 PM