सातारा : साताऱ्यातील गुरुवार पेठेत असलेल्या गुरुवार टाकीच्या व्हॉल्व्हला गुरुवारी सकाळी गळती लागली. पाणीपुरवठ्याच्या वेळेतच हा प्रकार घडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पालिकेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले तरी ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. साडेपाच लाख लिटर साठवण क्षमता असलेल्या गुरुवार टाकीतून पहाटे पाच ते सकाळी सहा व सकाळी सहा ते सात अशा दोन सत्रात पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी पहिल्या सत्रात पालिका कार्यालय ते गुरुवार टाकी या भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक टाकीजवळ असलेल्या व्हॉल्व्हची प्लेट निसटली अन् व्हॉल्व्हला मोठी गळती लागली. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. टाकीजवळ असलेल्या गुरुवार बागेत पाण्याचा अक्षरशः पाट वाहत होता. घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. दरम्यान, दुसऱ्या सत्रात गुरुवार टाकी, वाघाची नळी, जीवनज्योत रुग्णालय, शकुनी गणेश मंदिर, कमानी हौद पिछाडी या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पालिकेकडून येथील रहिवाशांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम पूर्ण करून नागरिकांना शुक्रवारी पूर्ण दाबाने व नियमित पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
बोंबाबोंब.. ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया, साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती
By सचिन काकडे | Published: May 09, 2024 5:43 PM