सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटानजीक ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजन धुराप्रमाणे रस्त्यावर पसरल्याने महामार्गावर थरार उडाला. सुमारे एक तासानंतर ऑक्सिजनची गळती आटोक्यात आणण्यात यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी, पुण्याहून कोल्हापूरकडे बुधवारी सांयकाळी ऑक्सिजनचा टँकर निघाला होता. सायंकाळी सहा वाजता वाढे फाट्याच्या अलीकडे हॉटेलनजीक अचानक टँकरमधून धूर येऊ लागला. टँकर चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तो घाबरला व टँकर बाजूला घेतला. चालकाने तत्काळ खाली उतरून पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती होत असल्याचे स्पष्ट झाले. टँकरवरील चालकाने या घटनेची माहिती त्याच्या अधिकार्यांना दिली. ऑक्सिजन लिकबाबत त्यातील तज्ज्ञाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सातारा पोलिसांनीही घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. महामार्गावर येणारी वाहने दूर अंतरावर थांबविण्यात आली.
ओव्हर फ्लोमुळे ऑक्सिजनची गळती झाल्याचे पोलिसांनी सांगितले. टँकरमधील सुमारे ५९ किलो ऑक्सिजन वाया गेला. मात्र, त्यानंतर ऑक्सिजनची गळती थांबविण्यात यश आले.
फोटो: जावेद खान