पाण्याचा अपव्यय
सातारा : शहरातील बुधवार नाका चौकात असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही पालिकेकडून ही गळती काढली जात नाही. ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खड्डेमय रस्त्याचा
वनवास संपला
सातारा : जुना मोटर स्टॅँड ते बुधवार नाका या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पालिकेकडून पूर्ण करण्यात आले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली परवड थांबल्याने वाहनधारकांसह व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
संरक्षक कठड्यांच्या
दुरुस्तीची मागणी
सातारा : सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील वाहतूक सध्या धोकादायक ठरू लागली आहे. या घाटातील ठिकठिकाणच्या संरक्षक कठड्यांची पडझड झाली असून, काही ठिकाणी संरक्षक कठडे केवळ नावालाच उरले आहेत. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी वाहनधारकांना अनेक अडचणी येत आहेत. बांधकाम विभागाने कठड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
संचारबंदीच्या
नियमांचे उल्लंघन
वाई : संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. बाजारपेठेत सकाळी सात ते अकरा या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. दुचाकीवरून डबलसीट प्रवास करण्यावर निर्बंध असताना, याकडे नागरिक जाणीवपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत.