महाबळेश्वर : ‘महाबळेश्वर तालुका दुर्गम डोंगरी भाग म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात कांदाटी विभागातील लाँचसेवा देखील बंद असते. त्यामुळे या कालावधीत येणाऱ्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात. माॅन्सूनपूर्व नियोजनाची माहिती देणे गरजेचे आहे. कोरोनांतर्गत शासकीय नियमांचे पालन करून कोरोनापासून स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करावा,’ असे आवाहन पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी केले.
तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रेणोशी, रुळे, वाळणे, अहीर, गाढवली, पिंपरी तांब, आकल्पे, निवळी, लामज, उचाट, सोळशी, वाघावळे या गावांना सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे समवेत भेटी देऊन अडीअडचणी जाणून घेतल्या.
टाळेबंदीमुळे ग्रामस्थांना पंचायत समितीला येता येत नसल्यामुळे सभापती यांनी सर्व खातेप्रमुखांसमवेत भेटी देऊन कोरोनाविषयक जाणीवजागृती केली.
गावातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. आरोग्यविषयक समस्या, बांधकाम विभाग, मनरेगा योजना, पाणी योजनेच्या अडीअडचणी, ग्रामपंचायत विभागाच्या योजना, कृषी विभागाच्या योजना, ऑनलाइन शिक्षण अशा विविध विषयांवर चर्चा करून या वेळी माहिती देण्यात आली.
या वेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, आरोग्य अधिकारी अजित कदम, कृषी अधिकारी एस. के. चिरमे, बांधकाम शाखा अभियंता वाय. बी. गारडे, पाणीपुरवठा शाखा अभियंता विशाल चव्हाण, विस्ताराधिकारी सुनील पारठे, सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.
चौकट
शेतीमालासह पूरक व्यवसायावर भर
‘तालुक्यातील दुर्गम भागातील गावांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून आपला तालुका सर्वच स्तरांवर आघाडीवर ठेवण्यासाठी तत्पर आहे. यापुढील काळात तालुक्यातून उदरनिर्वाहासाठी बाहेर गेलेल्या युवकांना परत तालुक्यात आणण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतीमालासह पूरक व्यवसायवाढीवर विशेष भर दिला जाणार आहे. लोकांना पायाभूत सुविधा देण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला जाणार असून आरोग्य व शिक्षण या विषयांकडे विशेष लक्ष देणार आहे,’ असेही संजय गायकवाड म्हणाले.