सातारा : ‘भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण २२ भाषा बोलल्या जातात. ज्या मुलांचे मातृभाषेत शिक्षण झाले आहे, अशा मुलांमध्ये ज्ञानग्रहण करण्याची आणि आकलनाची क्षमताही वाढते हे आता सिद्ध झाले आहे,’ असे मत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग व जिल्हा माहिती कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन सप्ताह व मराठी भाषा गौरव दिन निमिताने मराठी भाषिक कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनिसा मुजावर, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे प्रा. डॉ. कांचन नलावडे, डॉ. मानसी लाटकर आदी उपस्थित होते.
शेखर सिंह म्हणाले, ‘भारतात २२ भाषा बोलल्या जातात. त्यापैकी मराठी भाषा खूप जुनी आणि महत्त्वाची भाषा असून, या भाषेला मोठा इतिहास आहे. आज विविध भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, मातृभाषेचे जतन व संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. मातृभाषेमध्ये मोठी ताकद असून, पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. ज्या मुलांचे शिक्षण मातृभाषेत झालेले आहे, अशी अनेक मुले आज चांगल्या पदावर काम करीत आहे, पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतच शिक्षण देण्यावर भर द्यावा.’
उपप्रचार्य डॉ. अनिसा मुजावर म्हणाले, ‘जसे आपण आपल्या आईवर प्रेम करतो, तसे आपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये संस्कृत आणि प्राकृत भाषेमध्ये अभ्यास केला जातो. भविष्यकाळात ब्राम्ही लिपीचा कोर्स घेणार असून, हे महाविद्यालय मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम चांगल्या पद्धतीने करत आहे.’
मुख्य कार्यक्रमानंतर महाविद्यलयातील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन हस्ते करण्यात आले. भाषिक कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यशाळेस बी. व्होकचे प्रमुख प्रा. संपतराव पिंपळे, प्रा. शैलेश थोरात, प्रा. डॉ. सादिक तांबोळी, प्रा. डॉ. संजयकुमार सरगडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी दिनानिमित्त महाविद्यालयाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे. मराठी गीत गायन स्पर्धा- अमोल बल्लाळ प्रथम, अंजली गायकवाड व अदिती चिवटे द्वितीय, रांगोळी स्पर्धा-प्रीती पाटील व कोमल शिंदे प्रथम क्रमांक, ऋतुजा पाटील व सोनाली राजे द्वितीय, पोस्टर स्पर्धा-श्वेता शेडगे व आरजू इनामदार प्रथम, वषार्राणी बागल द्वितीय, हुमणे स्पर्धा- अमृता नलावडे प्रथम, कोमल मस्के द्वितीय, निबंध स्पर्धा-कोमल मस्के प्रथम, प्रमिला चव्हाण द्वितीय, घोषवाक्यनिर्मिती स्पर्धा-ईशा गायकवाड प्रथम, काजल जाधव द्वितीय, चित्रकला स्पर्धा-कोमल मस्के प्रथम, प्रियांका मगरे द्वितीय, म्हणी संकलन स्पर्धा-कोमल मस्के प्रथम, सोनाली राजे द्वितीय. या विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
भाषेचे वैभव जपले : युवराज पाटीलआपल्या मातृभाषेला खूप जुना इतिहास आहे, त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मातृभाषेत शिक्षण घेतल्यास विचारांची खोली वाढते. संगणकांचे सॉफ्टवेअर आज मराठीतही उपलब्ध होत आहेत. मराठी भाषेला एक संस्कृती आहे, त्याचे संशोधन होणे गरजेचे आहे. मराठी भाषा आपल्या सर्वांचा अभिमानाचा मानबिंदू असून, तिचे वैभव प्रत्येकाने जपले पाहिजे, असे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी सांगितले.