लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लॉकडाऊन करूनसुद्धा अनेक जण रस्त्यावर येऊ लागल्याने पोलिसांनी मंगळवारपासून वाहन जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मात्र यामध्ये अनेक जण पोलिसांवर दबाव आणून वाहने सोडून द्या, अशी मागणी करत आहेत. हे निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी आता जे कोणी गाडी सोडण्यासाठी फोन करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक शाखेमध्ये गाडी पकडल्यानंतर यापूर्वी अनेकदा पोलिसांना फोन केले जात होते. ओळखीचे आणि कोणी प्रतिष्ठित असेल तर पोलीस सहानुभूतीचा विचार करून गाडीवर कोणतीही कारवाई न करता सोडून देत होते. मात्र आता कोरोनाची भयावह परिस्थिती असताना अनेक जण पोलिसांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणत आहेत. जिल्हा पोलीस दलाने मंगळवारपासून वाहन जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात तब्बल ८०० हून अधिक वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. मात्र या कारवाई दरम्यान पोलिसांना प्रतिष्ठित लोकांकडून वेगवेगळे अनुभव येऊ लागले आहेत. काही जण गाडी पकडल्यानंतर पोलिसांना फोन करून गाडी सोडा अशी तंबी देत आहेत. हे प्रकार केवळ एका दिवसात बरेच घडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रकार आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यामुळे वरिष्ठांनी, आता जे कोणी गाडी सोडण्यासाठी फोन करतील त्यांचे फोन रेकॉर्ड करावेत. त्यानंतर पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणि आपत्कालीन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता वशिलेबाजी करून गाडी सोडण्याचे दिवस गेले आहेत, हे यावरून दिसून येत आहे.
पोलिसांनी अत्यंत कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. खरे तर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी घराबाहेर पडले नाही पाहिजे. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. घराघरात लोक बाधित आढळून येत आहेत. असे असताना पोलिसांवर दबाव आणून एक प्रकारे गुन्ह्याला प्रवृत्त केल्याचे प्रकार समोर येत आहेत. आता तरी सातारकरांनी पोलिसांना सहकार्य करून काही काम नसताना घराबाहेर पडू नका तरच ही कोरोनाची लाट आटोक्यात येईल.
चौकट : ओळखीचे आहेत म्हणून येईल अंगलट!
पोलीस एकमेकाच्या ओळखीचे असतात. या ना त्या कारणाने पोलिसांची ओळख झालेली असते. यामध्ये पत्रकार, नेते, नगरसेवक, डॉक्टर यांच्यासह सर्वसामान्य लोकांचेही पोलीस ओळखीचे असतात. आता या कारवाई दरम्यान या ओळखीच्या लोकांनी जर गाडी सोडा असा जर फोन केला तर त्यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांनी ही खबरदारी घेऊन गाडी सोडा ऐवजी बाहेर फिरू नका, असे सांगण्याची वेळ आली आहे.
चौकट : अजूनही लोक विनाकारण फिरतायत
दुसऱ्या दिवशी सातारा पोलिसांनी शहरात कारवाई करून ४२ वाहने जप्त केली. पोलिसांनी सकाळपासून वाहन जप्तीची मोहीम राबवली. त्यामुळे पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी वाहने रस्त्यावर कमी दिसून आली. मात्र तरीसुद्धा अनेक जण रस्त्यावर विनाकारण फिरताना पोलिसांना आढळून येत आहेत.