दत्ता यादव -- सातारा --हातात दंडुका घेतलेला खाकी गणवेशातला पोलिस पाहिलं की, भल्या भल्यांना कापरं भरतं. पोलिसांचा दरारा आणि रुबाब पाहिल्यानंतर पांढरपेशी माणसंही पोलिसांपासून चार हात लांबच राहतात; मात्र सातारा पोलिसांनी ही प्रतिमा बदलून टाकली आहे. कुटुंबीयांनी सोडलेल्या मायलेकांना खाकीने आपलसं केलंय. त्यांच्या दैनंदिन गरजा भागवता याव्यात म्हणून त्यांना कामही उपलब्ध करून दिलंय. सातारा पोलिसांच्या माणुसकीला अनेकांनी सलाम ठोकला आहे.कौटुंबिक कलहातून दोघांनीही घर सोडलं. दोन मुलं असतानाही ती अभागी माता घराबाहेर पडली. साताऱ्यात मिळेल ते काम करून एका मैत्रिणीसोबत उदरनिर्वाह करत होती. त्यातच मैत्रिणीचे अचानक निधन झाले. तिच्या मुलाला आपला मुलगा मानून तिने त्याचा सांभाळ केला. दोघांनाही कुटुंबानं सोडलं असलं तरी पोलिसांनी त्यांना तारलं. पोलिस ठाणे स्वच्छ करण्याचे काम त्यांना देऊन आर्थिक हातभार लावलाय. त्या दोघांचे घर आता पोलिस ठाणंच झालंय. बकुळाबाई चिकणे आणि संजय जगदाळे अशी अभागी मायलेकांची नावे आहेत. बकुळाबाई चिकणे या मूळच्या जावळी तालुक्यातील कुसंबी या गावच्या. तर संजय जगदाळे हा येथील शुक्रवार पेठेत राहणारा. बकुळाबार्इंनी पन्नासी पार केली आहे तर संजयनेही चाळीसी गाठलीय. बकुळाबाई सांगतायत, मला दोन मुलं. पाच वर्षांपूर्वी मला घरातून बाहेर काढलं. एवढेच नव्हे तर मी मेले म्हणून माझ्या मोठ्या मुलानं माझं कार्यही घातलं. घर सोडल्यापासून मी राजवाडा परिसरात राहत होते. त्या ठिकाणी संजयच्या आईची आणि माझी ओळख झाली. तीही अशीच माझ्यासारखी घराबाहेर राहत होती. आम्ही दोघी आणि तिचा मुलगा संजय हा आमच्यासोबत राहू लागला. संजयच्या आईचे अचानक निधन झाले. त्यानंतर तिच्या मुलाला माझा मुलगा समजूनच मी त्याचा सांभाळ केला. मिळेल ते काम करून त्याला खायला घालते. हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरले नाहीत. धाकटा मुलगा मला कधी-कधी भेटायला येतो. मात्र मोठा मुलगा येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पोलिस ठाण्याची भिंत बनली आसरा!तीन वर्षांपूर्वी बकुळाबाईने राजवाड्यावरून आपला संसार हलविला. शहर पोलिस ठाण्याच्या आवारात कुठे झाडाखाली तर कुठे भिंतीच्या आडोशाला हे दोघे राहू लागले. खाकी वर्दीतील माणूसही शेवटी माणूसच असतो. या खाकी वर्दीने या मायलेकांना आसरा तर दिलाच; पण उदरनिर्वाहाचे साधनही उपलब्ध करून दिलं. रोज पोलिस ठाण्याची स्वच्छता हे मायलेक करतात. या मोबदल्यात त्यांना दरमहा एक हजार ते बाराशे रुपये मिळतायत. शहर पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस भिंतीच्या आडोशाला त्यांनी संसार थाटलाय. एक पत्र्याची पेटी अन् दोन गोधडी एवढाच दोघांचा संसार. दरवर्षी पावसाळ्यात त्यांचा संसार कधी पालिकेच्या इमारतीत तर कधी दिसेल त्या इमारतीच्या बेसमेंटला सुरू असतो.म्हणे आम्हाला घरकूल मिळणार!माझी लाकडं आता स्मशानात पोहोचली आहेत. जे करायचं आहे ते मुलासाठी. त्याच्या नावावर मी रेशनिंग कार्डही काढले आहे. आम्हाला आता घरकूलही मिळणार आहे. मात्र ‘साहेब. आज या उद्या या,’ अशी उत्तरे देत असल्याचेही बकुळाबार्इंनी सांगितले.
कुटुंबानं सोडलं..पोलिसांनी तारलं !
By admin | Published: July 01, 2016 11:21 PM