लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : कोरोनाने जगाला विळखा घातल्यानंतर जन्मभूमीकडे धाव घेतलेल्यांपैकी अनेकजण पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे परतले आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशी, पररराज्यात तसेच परजिल्ह्यात ते वास्तव्याला गेले असून, कऱ्हाड तालुक्यातून पॅरिस, फ्रान्स, नायजेरियासह अन्य देशांमध्ये गेलेल्यांची संख्या जास्त आहे.
पुण्यानंतर कऱ्हाडला शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं. याठिकाणी विविध शाखांची शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. पदवीसह पदव्युत्तर शिक्षणही याठिकाणी मिळते आणि याच शिक्षणाच्या पंढरीत ज्ञानार्जन करून हजारो विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. साधारणपणे वैद्यकीय, इंजिनिअरिंग तसेच कायदेविषयक शाखांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी मिळते. कऱ्हाड तालुक्यातील अनेक युवक, युवतींना अशी संधी मिळाली आहे आणि ते परदेशातील कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये नोकरी करत आहेत. नोकरीबरोबरच काहींनी परदेशात व्यवसायही सुरू केले आहेत. या व्यवसायाच्या निमित्तानेही ते कुटुंबासह त्याठिकाणी वास्तव्य करतात. मात्र, मार्च २०२०मध्ये कोरोनाने जगभरात हाहाकार माजवल्यानंतर अशा परदेशस्थित कऱ्हाडकरांना आपल्या जन्मभूमीकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. विमानसेवा बंद होण्यापूर्वीच त्यांनी विमानाने दिल्ली, पुणे, मुंबईत आणि तेथून मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे धाव घेतली होती.
परदेशातून तसेच इतर राज्य आणि जिल्ह्यांतून आपल्या गावी आलेले असे शेकडो नागरिक कोरोनामुळे अनेक महिने आपल्या गावीच वास्तव्याला होते. मात्र, कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपापल्या नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी धाव घेतली असून, अपवाद वगळता सर्वजण पुन्हा परदेशी, परराज्यात तसेच परजिल्ह्यात वास्तव्याला गेले आहेत.
- चौकट
मुंबईला परतले : ४०२३
पुण्याला परतले : २३०१
- चौकट
परराज्यात गेलेले
गुजरात : १२
गोवा : २
पंजाब : ३
उ. प्रदेश : ३
दिल्ली : २
बंगलोर : ४
हैदराबाद : ४
चेन्नई : ३
आसाम : १
श्रीनगर : १
- चौकट
परदेशी गेलेले
अमेरिका : २
पॅरिस : १
दक्षिण आफ्रिका : १
जॉर्जिया : १
जर्मनी : १
दुबई : ८
नेपाळ : १
अरमेनिया : १
फ्रान्स : १
नायजेरिया : १
इजिप्त : २
बहरिन : २
केनिया : २
सियारॉन : १
इस्त्राईल : १
थायलंड : ५
फिलिपिन्स : १
हाँगकाँग : २
इतर : १२
- चौकट
नोकरी, व्यवसाय बदलले
मुंबई, पुण्यासह इतर राज्यांमध्ये आणि परदेशात वास्तव्याला असणाऱ्या काहीजणांनी गतवर्षी आपल्या गावी परतल्यानंतर नव्याने काही व्यवसाय सुरू केले तर काहींनी येथेच नोकरी स्वीकारली. त्यामुळे संबंधितांनी पुन्हा मागे वळून न पाहता जन्मभूमीतच राहणे पसंत केले आहे.
फोटो : १५ केआरडी ०४
कॅप्शन : प्रतिकात्मक