वडूज : राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वडूज नगरपंचयातीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोट बांधली असून, सर्वात अगोदर भाजपाने बैठक घेऊन बाजी मारली होती. तर राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्षांनी गुप्तगू बैठकांना प्राधान्य दिले. उमेदवार चाचपणी प्रक्रियेमध्ये मागे न राहता काँग्रेस पक्षानेही भरारी घेत दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाचारण करून आघाडी घेतली आहे. खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज नगरपंचायत निवडणुकीसाठी साम-दाम-दंड या सर्व आयुधांचा राजकीय वापर होणार यात तिळमात्र शंका नाही. १७ प्रभागांमध्ये विखुरलेल्या मतदारांनी ही निवडणूक अटीतटीची केली असून, येईल त्याचा ‘रामराम’ घेऊन ‘हो आम्ही तुमचेच ही राजकीय’ चाणाक्ष नीती वापरत सर्व इच्छुकांना खूश ठेवले जात आहे. या निवडणुकीदरम्यान उमेदवारांकडून ग्लोबल नीतीचा ही वापर होताना दिसून येत असला तरी मतदारांचे गौडबंगाल येणारा काळच विजयी माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरविणार आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या मतदार जास्तीत-जास्त आपल्या पक्षाकडे कसे वळतील, यासाठी सर्व ते प्रयत्न होताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून भाजपाने माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांच्याकडे खटाव-माण तालुक्यांतील सर्वच निवडणुकींची जबाबदारी दिली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. तर राष्ट्रवादी पक्षाने निवडणुकीचे सर्व अधिकार दोन्ही तालुक्यांसाठी आ. प्रभाकर घार्गे यांच्याकडेच सोपविल्याचे समजते. मात्र, असे अधिकार शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप, आरपीआय अशामधील कोणाकडेही सोपविले नसल्याचे वृत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत वडूज नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावयाचा यासाठी काँग्रेस पक्षाने या प्रक्रियेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाचारण केले. आ. जयकुमार गोरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे यांनी बाजी मारली आहे. मुलुख मैदानी तोफेने आणि विविध आकर्षक आंदोलनाने लक्षवेधी ठरलेले माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांची राजकीय आक्रमकता या निवडणुकीत अधिकच रंगत येणार, हे स्पष्ट होत आहे.
वडूजच्या मैदानात आता दिग्गज नेते...
By admin | Published: October 15, 2016 11:45 PM