मसूर : मसूर येथील ग्रामपंचायतीतर्फे केल्या जाणााऱ्या कचरा व्यवस्थापनाची राज्य सरकारने दखल घेऊन पंचायत राज दिनादिवशी महाराष्ट्रभर प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर मसूर येथील घंटागाडीचे छायाचित्र प्रसिद्ध केले. राज्यपातळीवर दखल घेतल्याने ग्रामस्थांचा ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’ उपक्रमासाठी हुरूप आले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी दोन ते अडीच वर्षांपासून काम करत आहेत.
सरपंच पंकज दीक्षित यांनी सर्वांच्या सहकार्याने मायक्रो प्लॅनिंग तयार केले. त्यानुसार कार्य करताना सुरुवातीला गाव स्वच्छ करण्यासाठी काय करता येईल, असा विचार पुढे आला. त्यातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दोन घंटागाड्या खरेदी केल्या. कचरा व्यवस्थापनाचे काम ठेकेदाराकडून करावयाचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार ठेकेदारामार्फत असलेल्या कामगारांकडून घंटागाड्या सकाळी सहापासून दुपारी एकपर्यंत गावातील गल्ली-गल्लीतील ओला व सुका कचरा गोळा करून तो एका ठिकाणी गोळा करतात. त्याचे योग्य पद्धतीने विघटन केले जाते.
ठेकेदारामार्फत कामगारांकरवी गावातील संपूर्ण गटारे, सार्वजनिक शौचालये स्वच्छ केली जात आहे. कचरा गोळा करण्यासाठी दोन घंटागाड्यांबरोबर ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टरही सकाळीच घेऊन जातात. दुपारी एकपर्यंत यांचे काम सुरू असते. हा दिनक्रम रोज ठरल्याप्रमाणे होत आहे. त्यानुसार मसूरची वाटचाल स्वच्छतेकडून समृद्धीकडे सुरू आहे.
ग्रामपंचायत स्वच्छतेसाठी काम करत असताना पतसंस्था, बँका, मेडिकल, दुकानदार, डाॅक्टरांच्या सहकार्याने गावातील सर्व कुटुंबांना ओला, सुका कचरा वेगळा साठविण्यासाठी पाच हजार कचरा कुंड्यांचे वाटप केले आहे. गावातील भिंतीवर जागा असेल तिथे स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे काढली आहेत. त्यातच राज्य सरकारने या कामाची दखल घेऊन कामाची पाेचपावतीच दिली आहे. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांबरोबरच ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
कोट
गावातील स्वच्छतेबाबतीत काम करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कोठेही कमी पडणार नाही. गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहे. शासनाने आमच्या कार्याची दखल घेतल्याने यापुढे अधिक जोमाने कार्य करू.
- पंकज दीक्षित,
सरपंच ग्रामपंचायत मसूर.
फोटो जगन्नाथ कुंभार यांनी मेल केला आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर प्रसिध्द केलेल्या पत्रकावर मसूर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.