सातारा : रक्ताच्या, जिवाभावाच्या नातेवाइकांसमवेत, बायका-मुलांबरोबर चार दिवस दिवाळी साजरी करून सातारकर आता शिक्षण, व्यवसायासाठी परतीच्या मार्गाला लागले आहेत. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.यंदा दिवाळीच्या सण सलग सुट्यांमुळे आनंदात साजरा करण्याचा योग जुळून आला होता. दिवाळी सणातील लक्ष्मीपूजन गुरुवारी होता. तर शुक्रवारी पाडवा होता. हे दोन दिवस शासकीय सुट्या होत्या. मात्र, त्यानंतर चौथा शनिवार व रविवार असे दोन बोनस सुट्या मिळाल्या. सलग चार सुट्यांचा आनंद घेण्यास मिळाला. राज्य परिवहन महामंडळाने सातारकरांच्या सोयीसाठी पुणे-मुंबईला जादा गाड्या सोडल्या होत्या. नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी सातारा सोडून पुणे-मुंबईला गेलेल्या सातारकरांना स्वत:च्या गावी येता यावे, यासाठी सातारा विभागातील विविध आगारांतून पुणे-मुंबईहून साताराला जादा गाड्या सोडल्या होत्या. गाड्याच्या गाड्या भरून येत होत्या. त्यानंतर मध्यंतरी दोन दिवस कमी करून भाऊबीजेनंतर प्रवासी परतणार आहेत. हे ओळखून आता पुन्हा साताराहून पुणे-मुंबईला जादा गाड्या सोडल्या आहेत. (प्रतिनिधी)जागा पकडण्यासाठी पळापळसातारा आगारातून पुणे, मुंबईला ‘विना वाहक-विना थांबा’ गाड्या सोडल्या आहेत. मात्र, काही लोक या ठिकाणी लागलेल्या रांगेत थांबण्यापेक्षा बाहेरील विभागातून येत असलेल्या गाड्यांनी जाणेच पसंत करत आहेत. या गाड्यांनाही मोठी गर्दी असल्याने अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागत होता. गाडी येऊन थांबताच चालकाचा दरवाजा, संकटकालीन मार्गातून तरुण मंडळी जागा धरण्यासाठी पळत होते. तर दरवाजातून आत जाणे महिलांना शक्य होत नव्हते. त्यामुळे खिडक्यांतून साहित्य टाकून जागा पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती.आरक्षणासाठी इंटरनेटचा वापरलांब पल्ल्यांच्या गाड्यांना ऐनवेळी गडबड नको म्हणून असंख्य प्रवाशांनी बसस्थानकात येऊन आगाऊ आरक्षण केले. तर काहीनी इंटरनेटवरून आॅनलाईन नोंदणी केली. प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता आले. यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
लेकी-बहिणी निघाल्या सासुरा!
By admin | Published: October 26, 2014 9:27 PM