दरम्यान, बिबट्याने मुलावर हल्ला चढविला असताना तेथूनच काही अंतरावर उभ्या असलेल्या युवकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे जखमी मुलाला सोडून बिबट्याने डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. रात्री उशिरापर्यंत परिसरात त्याचा शोध घेतला जात होता. मात्र, बिबट्या आढळून आला नाही.
गत आठ दिवसांपासून दक्षिण तांबवे परिसरामध्ये विविध वस्त्यांवर तसेच शिवारामध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन घडत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ दहशतीखाली वावरत आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्यासुमारास दक्षिण तांबवे येथील डोंगराजवळ असणाऱ्या बेघर वस्तीत राज दीपक यादव (वय ८) या मुलावर बिबट्याने हल्ला चढविला. राज सध्या तिसरीमध्ये शिक्षण घेत असून, शुक्रवारी सायंकाळी तो अंगणात बांधलेली गाय शेडमध्ये बांधण्यासाठी गेला होता. त्यावेळी मोकाट श्वानाचा पाठलाग करीत आलेल्या बिबट्याने राजवर झडप घातली. हा प्रकार काही युवकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे मुलाला सोडून बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात राजच्या पाठीवर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पंजाच्या नख्या पाठीमध्ये रुतल्या असून, इतरही जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तांबवे परिसरातील डेळेवाडी, पाठरवाडी या डोंगर पठारावर बिबट्याचा अनेक वर्षांपासून वावर आहे. यापूर्वीही त्याने गमेवाडी, पाठरवाडी येथे ग्रामस्थांवर हल्ला केला होता. त्यावेळी वन विभागाकडून पिंजराही लावण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये बिबट्या अडकला नाही. उलट त्याने शेकडो जनावरांवर हल्ले करून त्यांचा फडशा पाडला आहे.
- चौकट
आठ दिवसांपासून वावर
गत आठ दिवसांपासून दक्षिण तांबवे येथील डी. आर. पाटील यांच्या वस्तीवर तसेच लगजी पाटील वस्ती, चचेगावकर गुऱ्हाळ, पानमळा, पाळकात, मदने विहीर या शिवारात बिबट्याचे शेतकऱ्यांना वारंवार दर्शन होत आहे. तीन बछड्यांसह बिबट्या वावरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे.
- चौकट (फोटो : ०९केआरडी०४)
‘तो’ व्हिडीओ व्हायरल
चार दिवसांपूर्वी टेक शिवारात आप्पासाहेब पाटील यांच्या वस्तीजवळ बिबट्या दिसला होता. युवकांनी त्याचा व्हिडीओ बनविला होता. तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर ‘व्हायरल’ झाल्यामुळे आसपासच्या गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर लगेचच बिबट्याने मुलावर हल्ला केल्याने ग्रामस्थांमधील भीती आणखी वाढली आहे.
फोटो : ०९राज यादव
कॅप्शन : बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला राज यादव.