कऱ्हाड : मालखेड, ता. कऱ्हाड येथे ऊसाच्या फडात शेतकऱ्यांना बिबट्याची दोन बछडी आढळून आली. वन विभागाने तात्काळ धाव घेत बछड्यांना सुरक्षितरीत्या शिवारातच ठेवले. रात्रभर त्यांच्यावर कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री मादी बिबट्याने त्याठिकाणी येवून दोन्ही बछड्यांना आपल्यासोबत नेले. वन विभाग आणि वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स पथकामुळे आई आणि त्या बछड्यांचे पुनर्मिलन झाले.कऱ्हाड तालुक्यातील मालखेडच्या शिवारात गत काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. अनेक शेतकºयांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण होते. अशातच गुरुवारी, दि. १५ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातील रामचंद्र ज्ञानू मोरे त्यांच्या ‘कूळकी’ नावच्या शिवारात गेले होते. त्याठिकाणी त्यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. ऊस तोडणी सुरू असताना सरीमध्ये रामचंद्र मोरे यांना बिबट्याची दोन बछडी सापडली.रामचंद्र मोरे यांनी तत्काळ सरपंच सुरज पाटील व पोलीस पाटील इंद्रजीत ठोंबरे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी ही माहिती वनपाल आनंद जगताप यांना दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, अभिजित शेळके त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले. तसेच वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स पथकाला पाचारण करण्यात आले. या टीमचे रोहीत कुलकर्णी, गणेश काळे, अजय महाडीक, रोहीत पवार, सचिन मोहिते, अनिल कोळी हे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी ज्याठिकाणी बछडी सापडली त्याचठिकाणी कॅरेटमध्ये बछड्यांना ठेवून परिसरात कॅमेरे लावले. त्यानंतर मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्या त्याठिकाणी आला. त्या बिबट्याने दोन्ही पिलांना आपल्या सोबत शिवारात नेले.
Satara: बिबट्याची बछडी आईच्या कुशीत विसावली, रात्रभर कॅमेऱ्यांचा ‘वॉच’
By संजय पाटील | Published: February 16, 2024 4:38 PM