कºहाड : गत आठवड्यात काले परिसरातील चौगले मळ्यात ऊसतोडीदरम्यान सापडलेला बिबट्याचा बछडा सहा दिवसांनी आईच्या कुशीत विसावला. सोमवारी पहाटे मादी बिबट्याने त्या बछड्याला आपल्या सोबत नेले. माय लेकराच्या भेटीचा हा अनोखा क्षण वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैदही झाला.काले येथील चौगुले मळ्यात ९ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जयकर पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. कामगारांनी ती बछडी उचलून सुरक्षितस्थळी नेली. तसेच त्या बछड्यांची आई ऊसाच्या फडात असावी म्हणून कामगारांनी संबंधित फड पेटवून दिला. त्याचवेळी मादी बिबट्या त्या शेतातून दुसºया शेतात जाताना कामगारांना दिसला. संबंधित कामगारांनी या घटनेची माहिती पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर याबाबत वन विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर परिक्षेत्र वनअधिकारी डॉ. अजित साजणे आणि मानद वन्यजिव रक्षक रोहण भाटे त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी दोन्ही बछडे ताब्यात घेऊन कºहाडला आणले. त्यापैकी एका बछड्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले. तर दुसºया जिवंत बछड्याला वन विभागाने सुरक्षित ठिकाणी ठेवले. दरम्यान, बछडे दुरावल्यामुळे मादी बिबट्या हिंस्त्र होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे बछडा ज्याठिकाणी सापडला त्याचठिकाणी पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत डॉ. साजणे यांनी जुन्नर येथील बिबट्या पुनर्वसन केंद्राच्या डॉ. अजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. तसेच घटनास्थळी येण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी इंग्लडहून कºहाडला आले. तत्पुर्वी ९ एप्रिल रोजीच रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बछड्याला एका कॅरेटमध्ये ठेऊन त्याला संबंधित ऊसाच्या फडात ठेवण्यात आले. दुसºया दिवशी पहाटे साडेचार वाजता त्या बछड्याची आई असलेली मादी त्याठिकाणी आली. बछड्याचा वास घेऊन ती तेथून निघून गेली. त्यानंतर सलग पाच दिवस त्या बछड्याला त्याचठिकाणी ठेवण्यात आले.दरम्यान, सहाव्या दिवशी म्हणजेच सोमवारी, दि. १५ पहाटे मादी त्याठिकाणी आली. तीने बछड्याला पाहिले. काहीकाळ परिसरात घुटमळली. आणि काही वेळातच त्या बछड्याला सोबत घेऊन ती शिवारात निघून गेली. मादी बिबट्याच्या या सर्व हालचाली वन विभागाने लावलेल्या कॅमेºयात कैद झाल्या आहेत.बछड्यास सलग सहा दिवस मेंढीचे दूधकाले परिसरात बिबट्याच्या मादीचे बछडे सापडल्यानंतर त्यास कोणते अन्न द्यायचे, असा प्रश्न पशूवैद्यकीय अधिकाºयांपुढे निर्माण झाला होता. त्यांनी तत्काळ जुन्नर येथील तज्ज्ञ डॉ. अजय देशमुख यांची मदत घेतली. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मेंढीचे दूध देण्यास सांगितले. त्यानंतर बिबट्याच्या बछड्यास सलग पाच दिवस दर तीन तासाला २५ मिली इतके मेंढीचे दूध पाजण्यात आले.
बिबट्याचा बछडा आईच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:31 PM