कऱ्हाड : वनवासमाची, ता. कराड येथील शिवारात शनिवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्याठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृत बिबट्या ताब्यात घेण्यात आला आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वनवासमाची परिसरात गत अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. वारंवार ग्रामस्थांना त्यांचे दर्शन होत आहे. शनिवारी सकाळी गावातील महादेव जमदाडे यांच्या वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या महादेव मंदिरानजीक ग्रामस्थांना मृत बिबट्या दिसला. घटना गावात समजताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली.दरम्यान, याबाबतची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांच्यासह अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला.बिबट्याचे दात, पंजा यासह इतर अवयव सुस्थितीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. तसेच त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचेही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वैद्यकीय शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Satara: शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला, कराड तालुक्यातील घटना
By संजय पाटील | Published: April 13, 2024 12:17 PM