राजेंद्र लोंढेमल्हारपेठ : उरुल-ठोमसे रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक बसून अंदाजे नऊ महिन्यांची मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. डोक्याजवळ अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आज, शनिवारी नवसरी येथील स्मशानभूमीत वनविभागाकडून मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत माहिती अशी की, ठोमसे येथील ग्रामस्थ विक्रम माने, आबा माने व राजेंद्र माने हे शुक्रवारी रात्री घराकडे जात असताना पवार वस्तीजवळील रस्त्यामध्ये मृतावस्थेत बिबट्या दिसला. त्यांनी त्वरित घटनेची माहिती वनविभागास दिली. रात्री दोनच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पवार मळ्यानजीक जाऊन तेथील दोन-तीन ग्रामस्थांना बरोबर घेऊन घटनास्थळी भेट दिली. यावेळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. रात्रीची वेळ असल्यामुळे बछड्याची आई आसपास परिसरात असण्याची शक्यता असल्याने सावध भूमिका घेत वनविभागाने बछड्याला तेथून मल्हारपेठ येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. बछड्याच्या डोक्याला जोरदार इजा होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Satara News: उरुल-ठोमसे रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळला
By दीपक शिंदे | Updated: August 5, 2023 15:19 IST