राजीव पिसाळ
पुसेसावळी : शामगाव ता . कर्हाड येथील रहदारीच्या शामगाव घाटात वडूज, निमसोड व शितोळे नगर मधील युवकांच्या मोटारसायकल समोरून बिबट्याने जोरदार धूम ठोकली. शामगाव घाटातील आल्हाददायक पावसाळी वातावरणाचा आनंद घेत मोबाईल शूटिंग करताना बिबट्या मोबाईल मध्ये कैद झाला. अचानक मोटारसायकलला आडवा आलेल्या बिबट्यामुळे त्याच्या दर्शनाने आनंद ही वाटला व भितीही वाटली असल्याचा सुखद वृत्तांत दिवसभर सोशल मीडीयावर सुरू होता.
खटाव तालुक्यातील विजय शिंदे तसेच निमसोड व शितोळे नगर मधील युवक व त्याचे मित्र कर्हाडहून वडूजकडे निघाले होते. त्यावेळी जोरदार पाऊस पडून गेला होता व पावसाची बारीक रिपरिप सुरू होती. अशा अल्हाददायी निसर्गरम्य दृश्याचे त्यांच्याकडून मोबाईलवर चित्रीकरण चालू होते. एवढ्यात शामगाव घाटातील डोंगर कपारीतून एक मोठा बिबट्या बाईक समोरून डोळ्यांची पापणी लवायच्या आत जोरात पळत गेला.
त्यावेळी गाडी चालवणाराचा हृदयाचा ठोका चुकला व भितीने गाळण उडाली. त्याने जर गाडीवर झेप घेतली असती तर काय झाले असते याची भितीही काहीक्षण थरकाप उडवून गेली होती. पण एवढ्या जवळून बिबट्या बघायला मिळाले याचा आनंद सुद्धा होता. दिवसा ढवळ्या बिबट्याच्या दर्शनाने एकटे - दुकटे जाणाऱ्या लोकांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याच्या चर्चेला देखील उधाण आले होते.
आजपर्यंत सर्कशीमध्येच पाहिलेले वाघ, सिंह, बिबट्या आज प्रत्यक्षदर्शींनी दिसला. याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मित्रांची चौकशी इतर मित्रांकडून दिवसभर सुरू होती. तर निसर्गाच्या सानिध्यातच हे प्राणी पाहयला छान वाटतात अश्या बोलक्या प्रतिक्रिया ही एका वेगळ्या विश्वात नेहत होत्या.