वाई : मांढरदेव घाट परिसरासह वेरुळी व सोमेश्वरवाडी या परिसरात दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. डोंगर कड्यावर घनदाट झाडी असल्याने मुक्त संचार दिसून आल्याने मांढरदेव गावातील काही तरुणांनी पाहिले. या तरुणांची या बिबट्याचा व्हिडिओ तयार करून अनेक ग्रुपवर व्हायरल केला आहे. हा बिबट्या रात्री आठच्या सुमारास वेरुळी (सोमेश्वर) येथे फिरत असताना आढळून आला. घाटालगतच्या व दुर्गम सर्वच गावांमध्ये गुराखी आपापली जनावरे चारण्यासाठी जात असतात. त्यामुळे पाळीव जनावरांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
झाडाझुडपांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने वन्यप्राण्यांचा या वाढलेल्या झाडीचा आधार घेऊन बिबट्याने आपला मुक्त संचार चालू ठेवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. मांढरदेव येथील मंदिर परिसरात असणाऱ्या दाट जंगलात दहा दिवसांपूर्वी याच बिबट्याचा वावर आढळून आला होता.
या परिसरातील कुत्र्याची लहान पिल्ली या बिबट्याने फस्त केली होती. त्यामुळे शेतामध्ये काम करणाऱ्या महिला भीतीच्या वातावरणात शेतात काम करीत आहेत. मांढरदेव गावातील शेतकऱ्यांच्या शेळ्या फस्त केल्याची घटना घडली आहे. मांढरदेव येथील देवीच्या दर्शनाला भाविकांची नेहमीच गर्दी असते. बिबट्याच्या वावरामुळे भाविक देवीला येण्याचे टाळत आहेत. वाई वन विभागाकडे या भागातील शेतकऱ्यांनी तक्रार करूनही वन विभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यश आलेले नाही. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
वनविभागाने जीवितहानी होण्याची वाट न पाहता बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे. सह्याद्री रांगांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. बिबट्याबाबत वाई वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. वाई तालुक्यात घनदाट जंगल असलेल्या परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरी वस्तीतसुद्धा भीतीचे वातावरण आहे.