कोयनानगर : कोयना भागातील गाढखोप गावातील मालकी क्षेत्रात नर जातीच्या बिबट्याचा सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याची नेमकी शिकार करण्यात आली की नैसर्गिक मृत्यू झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, वन्यजीव विभागासमोर मृत कारण शोधण्याचे आव्हान असणार आहे. याबाबत वन्यजीव विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, काल, बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाईड लाईफ इंस्ट्युट ऑफ इंडियाचे प्रशिक्षणार्थी गाढखोप बाजे गावाच्या दरम्यान सामाजिक सर्व्हक्षण करत होते. यावेळी रानात बिबट्याचा अर्धवट सडलेल्या अवस्थेतील सांगाडा आढळला.
याबाबतची माहिती त्यांनी संबंधिताना दिली असता हेळवाक वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल संदिप जोपळे, सह्यायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे यांनी रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या परिसरात वन कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता संशयास्पद काही आढळले नाही. दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी रात्रभर पहारा दिला. आज,गुरूवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली मात्र मृत्यूचे कारण समजु शकले नाही.
अंदाजे 10 ते15 दिवसापूर्वी जुने सडलेल्या अवस्थेत मृत बिबट्यास भटक्या कुत्र्यांनी ओडून शेता कडेला आणून खाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर मृत बिबट्याचा तातडीने पंचनामा केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी वाकतकर यांनी शविच्छेदन केले. यानंतर जागेवर बिबट्याचे दहन करण्यात आले. यावेळी घटनास्थळी मानद वन्यजीव रक्षक सुनिल भोईटे, महेश शेलार, स्थानिक गावचे पोलीस पाटील सागर जाधव, संग्राम कांबळे व गाढखोपचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.मृत बिबट्याची सर्व पायांची नखे सुळके व दात हे सुस्थितीत असुन कातडे हे सडलेले अवस्थेत होते. पुढील तपास हेळवाकचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे करीत आहेत.