मरळी येथील तुकाराम कदम यांच्या कुटुंबातील सर्व जण मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जेवण करीत होते. त्यावेळी घराबाहेर असणारा त्यांचा श्वान भुंकत घरात आला. त्यामुळे सर्व जण बाहेर गेले असता दरवाजात त्यांना बिबट्या दिसला. आरडाओरडा करून त्यांनी बिबट्याला हुसकावले. मात्र, पुन्हा रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो त्याठिकाणी आला होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आज येथे तर उद्या दुसरीकडे बिबट्या दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरश: हैराण झाले आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या ज्वारीचे पीक काढणीच्या अंतिम टप्प्यावर आले आहे. त्यामुळे शेतकरी डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस पिकाची राखण करत आहे. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरीवर्ग पुरता घाबरून गेला आहे. यापूर्वीही मरळीच्या शिवारामध्ये बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन झाले आहे. शेडमधील जनावरे, कोंबड्या, पाळीव श्वान यांच्यावर हल्ले करून त्यांना फस्त केले आहे. परिसरामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून येत आहेत.
मानवी वस्तीनजीकचा बिबट्याचा नित्य वावर ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अनेक गावांत बिबट्याची डरकाळी नित्याची झाली असून यामध्ये शेतक-यांचे पशुधन धोक्यात आले आहे. हे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज विभागातील शेतक-यांतून व्यक्त होत आहे.
- चौकट
मरळी विभागातील अनेक गावांतील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून त्यांना ठार केल्याचे प्रकार सतत घडत आहेत. यापूर्वी बिबट्याचा वावर होता. मात्र, पुरावा नव्हता. मंगळवारी रात्री बिबट्याला पळवून लावताना त्याचे मोबाइलवरून फोटो काढण्यात यश मिळाले. वनविभागाकडून शेतक-यांना मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे. वनविभागाने परिसरात वावरत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतक-यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी बाधित शेतकरीवर्गातून होत आहे.
- संजय पाळेकर, प्रत्यक्षदर्शी
फोटो : ०४केआरडी०१
कॅप्शन : मरळी, ता. पाटण येथे मंगळवारी रात्री गावात शिरकाव केलेल्या बिबट्याला हुसकावून लावताना ग्रामस्थांनी मोबाइलवर त्याला कॅमेराबद्ध केले.