कऱ्हाड : वनक्षेत्रातील गर्द झाडीचा अधिवास सोडून बिबट्या उसाच्या शिवारात रमला. डोंगर-दऱ्यांतील ओबडधोबड रस्ते सोडून तो शिवारातील पाणंद रस्त्यावर हिंडला; पण सध्या या पोषक अधिवासातही त्याच्यावर मृत्यू ओढवतोय. अपघातासह नैसर्गिक कारणास्तव त्याचा बळी जातोय. जिल्ह्यात गत नऊ वर्षांत तब्बल २३ बिबट्यांचा असाच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील साजुरच्या शिवारात मंगळवारी मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला. ‘क्रोनिक न्यूमोनिया’मुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. वास्तविक, न्यूमोनियाने मृत्यू झालेला हा एकमेव बिबट्या नाही. जिल्ह्यात यापूर्वीही न्यूमोनियासह अन्य आजारांनी बिबट्यांचा जीव घेतला आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी चार तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर आहे. त्यापैकी कऱ्हाड आणि पाटणमध्ये प्रादेशिक वनहद्दीत त्याची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. उसाचे शिवार हाच अधिवास असल्याचा अनुवांशिक बदल झाल्यामुळे बिबट्या त्याच्या मूळ अधिवासात जायला तयार नाही. त्यातच सध्या शिवारात वावरणाऱ्या सर्वच बिबट्यांचा जन्म याच अधिवासातला. त्यामुळे गावोगावचे शिवार हेच घर मानून ते मानवी वस्तीनजीक वावरताहेत.
मानवी वस्तीनजीकचे शिवार बिबट्यांसाठी पोषक अधिवास असल्याचे सांगितले जाते; मात्र तरीही त्यांचा बळी जात असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. अपघातासह आजारपणामुळे त्यांच्यावर मृत्यूचे संकट ओढवत असून जिल्ह्यातील चार तालुक्यांत गत आठ वर्षांमध्ये तब्बल २३ बिबट्यांचा नाहक बळी गेला आहे.
- चौकट (फोटो : २८केआरडी०४)
अपघातही ठरतोय मृत्यूचे कारण
जंगलात प्राण्यांचे भ्रमणमार्ग निश्चित असतात. सहसा त्याच वाटेवरून ते प्राणी भ्रमंती करतात; मात्र सध्या प्रादेशिक वनहद्दीत वावरणारे बिबटे वाट मिळेल त्या दिशेने मार्गस्थ होताहेत. त्यांच्या या मार्गात ग्रामीण, जिल्हा, राज्य तसेच महामार्गाचे जाळे आहे आणि या जाळ्यातून मार्ग काढताना बिबट्यांवर अपघाती मृत्यू ओढवत आहे.
- चौकट (फोटो : २८केआरडी०५)
मृत बिबट्यांमध्ये...
अपघाती : ३०.४३ टक्के
नैसर्गिक : ५६.५२ टक्के
शिकार : १३.०४ टक्के
- चौकट
वनक्षेत्रानुसार बळी
सातारा : ३
महाबळेश्वर : ३
कऱ्हाड : ११
पाटण : ४
मेढा : २
- चौकट
वर्षनिहाय मृत्यू
२०१२-१३ : १
२०१३-१४ : ३
२०१४-१५ : ३
२०१५-१६ : १
२०१६-१७ : १
२०१७-१८ : २
२०१८-१९ : १
२०१९-२० : ३
२०२०-२१ : ७
२०२१-२२ : १
- चौकट
कशामुळे किती बळी..?
१३ : विविध आजार
७ : वाहनांच्या धडकेत
१ : शॉक लागून
३ : शिकाऱ्यांकडून
- चौकट
कऱ्हाडसह पाटण तालुक्यात मृत्यू झालेल्या एकूण बिबट्यांपैकी बहुतांश बिबट्यांचा न्यूमोनियासह इतर आजारांनी मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्याच्या कालावधीत हे मृत्यू ओढवतात. अधिवास पोषक असला तरी मृत्यूचे हे वाढते प्रमाण निश्चितच चिंतानजक आहे. बिबट्यांचा भ्रमणमार्ग सुरक्षित असणे गरजेचे असते; मात्र काहीवेळा अपघातातही त्यांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.
- रोहन भाटे
मानद वन्यजीव रक्षक
फोटो : २८केआरडी०६
गांधीटेकडी-मारूल हवेली येथे फेब्रुवारीमध्ये मरणासन्न स्थितीत बिबट्याचा बछडा आढळला होता. या बछड्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.