सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवकही कमी आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला ३४, नवजा ५३ आणि महाबळेश्वरला ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर असून विसर्ग सुरूच आहे.जिल्ह्यात जुलै महिना सुरु झाल्यापासून चांगला पाऊस पडत आहे. जुलैमधील सुरुवातीचे १५ दिवस पावसाचे होते. त्यावेळी पूर्व दुष्काळी भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले. पण, पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडला. त्याचबरोबर लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशा प्रमुख धरणातही वेगाने पाणीसाठा वाढला. मात्र, १५ जुलै नंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर ऑगस्ट महिना सुरु झाल्यानंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. सध्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात पाऊस होतच आहे.आज, शुक्रवारी सकाळ पर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे ३४ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ५३ आणि महाबळेश्वरला ३५ मिलीमीटरची नोंद झाली. एक जून पासूनचा विचार करता कोयनेला ३६९१, नवजा येथे ४,३४१ आणि महाबळेश्वरमध्ये ४,८०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे.कोयनेत ९७ टीएमसीवर साठाकोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. शुक्रवारी सकाळी धरणात ९७.१८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात २३ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्याचबरोबर सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० आणि सहा दरवाजे तीन फुटांनी उचलून १९,४७६ असा एकूण २१,५७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर आहेत.
पावसाचा जोर कमी; कोयनेचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर, विसर्ग सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 3:52 PM