ढेबेवाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील प्रश्नांंसह सामान्य ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने मान्याचीवाडीकरांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. गावातील सर्वच घरांच्या भिंती आता स्पर्धा परीक्षेचे धडे देऊ लागल्याने या गावकऱ्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गल्लीबोळातून ये-जा करताना तसेच सार्वजनिक ठिकाणी खेळतानाही मुलांमध्ये भिंतीवरील प्रश्नोत्तरांंच्या वाचनाची आवड निर्माण होऊ लागली आहे. लोकसहभागातून राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
राज्य आणि केंद्र्र शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणारे पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे सुमारे पाचशे लोकसंख्येचं गाव. पंचायतराज व्यवस्थेमध्ये नेहमीच आपले वेगळेपण टिकवून ठेवणा-या या गावाने अन्य गावांसाठीही दिशादर्शकाची भूमिका ठेवली आहे. गावातील ग्रामस्थांच्या एकीतून आणि श्रमदानातून डोंगराएवढी विकासकामे उभारल्याने ग्रामविकासाची ओढ येथील जनतेमध्ये निर्माण झाली.
गावातील ग्रामस्थांच्या भौतिक आणि मूलभूत सुविधा निर्माण करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरली. दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगातून कुटुंबेही सक्षम होऊ लागली आहेत. मात्र भविष्यात गावातील तरुण स्पर्धेमध्ये कुठेही कमी पडू नयेत, यासाठी त्यांना सहज सामान्य ज्ञानाचे धडे मिळाले पाहिजेत, हा विषय समोर आला. त्यानुसार ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण गावातील भिंतींवर सामान्य ज्ञानाच्या प्रश्नोत्तरांंचे लिखाण करण्यात आले. एकाच रंगात रंगविलेल्या गावातील सर्वच भिंती आता बोलक्या बनल्या आहेत. यामुळे ये-जा करणाºया सर्वांना या अनोख्या उपक्रमाचे औत्सुक्य वाटू लागले आहे.
- छोट्या-छोट्या गल्ल्यांचे नामकरण
गावातील छोट्या-छोट्या गल्ल्यांतील भिंतींवर केलेल्या लिखाणाची वर्गवारी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमानुसार गणितीय गल्ली, इतिहास गल्ली, सामान्यज्ञान गल्ली अशाप्रकारे गल्ल्यांची ओळख निर्माण केली आहे. गावातील सार्वजनिक आणि वैयक्तिक घरांच्या भिंतींवर सुमारे दोन हजार स्क्वेअर फूट जागेचा वापर करून दोन हजार प्रश्न-उत्तरे लिहिण्यात आली आहेत. चालता-बोलता आणि खेळता-खेळता ज्ञानवृद्धी असा उपक्रम आहे. यामधून विद्यार्थ्यांचा निश्चितपणे बुद्ध्यांक वाढण्यास मदत होईल. भविष्यात याचा उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी होईल.