म्हसवड : वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण... वाचायला अवघड वाटतंय ना? आणि विश्वास तर अजिबातच बसत नसेल; पण मुलांना घडविण्याची जिद्द ज्या शिक्षकांकडे आहे, ते विपरित परिस्थितीवर मात विद्यार्थ्यांना घडवतात, याचा वस्तुपाठ विजयनगरच्या तंत्रस्नेही शिक्षक बालाजी जाधव यांनी ठेवला आहे. या शाळेतील मुलं तामिळनाडूच्या शिक्षकांकडून अॅनिमेशनचे धडे गिरवत आहेत.
महादेवाच्या डोंगरावर असलेले विजयनगर (पर्यंती) ही अगदी छोटी वस्ती. यावर्षीच्या बदलीने या गावच्या शाळेला एक अभिनव असा शिक्षक लाभला तो म्हणजे गुगल सन्मानित बालाजी जाधव. त्यांनी यापूर्वी पुळकोटीच्या शाळेत अवघे जग उभे केले होते. त्याच शिक्षकाने एक दुर्गम भागातील शाळेत जिथे वीजपुरवठासुद्धा नाही तेथे स्वत:चा लॅपटॉप वापरून मुलांना तंत्रज्ञानाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे या नवीन शाळेतसुद्धा त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू केली. त्याद्वारे अॅनिमेशन धडे देण्यासाठी म्हणून तामिळनाडू येथील जॉन एम. राजा नावाचा शिक्षक स्काईपद्वारे विजयनगर या शाळेतील गोरगरिबांच्या मुलांना प्रशिक्षण देतात. यात अॅनिमेशन निर्मिती, त्याचा शिक्षणात वापर कसा करावा? याबद्दल दर आठवड्याला एक किंवा दोनवेळा अर्धा तास व्हिडीओ कॉन्फरन्सने हजारो किलोमीटरवरून मार्गदर्शन करत आहेत. यामुळे विजयनगरच्या शाळेतील मुले आगदी उत्साहात आहेत. विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा या अभिनव उपक्रमामुळे अगदी आनंदी झाले आहेत. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुले मराठीतून प्रश्न विचारतात आणि बालाजी जाधव त्याचे भाषांतर करून जॉन यांना सांगतात. याचप्रमाणे त्यांचे बोलणे मुलांना समजावतात. विविध प्रकारचे सॉफ्टवेअर वापरून कसे अनिमेशन सहज बनवले जातात, याचा डेमो जॉन देतात. विजयनगर शाळेतील शिक्षक, विद्यार्थी त्याप्रमाणे अॅनिमेशन शिकण्याचा एक अभिनव प्रयोग ग्रामीण भागात होत आहे. प्रथम मुले अगदी अवाक् होऊन नुसती पाहायची. मात्र आता सरावाने ते चांगला संवाद साधून नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
बालाजी जाधव यांनी सांगितले की, शहरी भागात हे घडत असेल तर विशेष नाही. मात्र इतक्या दुर्गम भागात तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे. त्यामुळे शिकणे आणि शिकवणे सुलभ आणि परिणामकारक होत आहे. ही बाब खूपच समाधानकारक आहे. या अशा नावीन्यपूर्ण शिकण्याच्या संधीमुळे या ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांना उद्याचे अनिमेशन निर्माते होण्याचा मार्ग मोकळा होतोय. हा या शिकण्याचा खरा अर्थ आहे. लवकरच येथील मुले बालाजी जाधव व या शाळेचे मुख्याध्यापक भोजा काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम तंत्रज्ञान अवगत करतील, असा आत्मविश्वास या दोन्ही शिक्षकांनी दाखवला आहे. शिक्षण क्षेत्रात असे शिकण्याचे विविध मार्ग खरेतर सर्व शाळा व शिक्षक यांनी अवलंब करायला पाहिजे, असे आवाहन बालाजी जाधव यांनी केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या संपर्काचा उपयोग बालाजी जाधव यांच्यासारखे शिक्षक सातत्याने करत आहेत, त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
शहरी भागात हे घडत असेल तर विशेष नाही, मात्र इतक्या दुर्गम भागात तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे, त्यामुळे शिकणे आणि शिकवणे सुलभ आणि परिणामकारक होत आहे. अशा नावीन्यपूर्ण शिकण्याच्या संधीमुळे या ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांना उद्याचे अॅनिमेशन निर्माते होण्याचा मार्ग मोकळा होतोय, हा या शिकण्याचा खरा अर्थ आहे.- बालाजी जाधव, शिक्षक