कोल्हापूरच्या छत्रपतींना ‘कमळ’वाल्यांनी ‘खासदारकी’चा सन्मान देताच ‘घड्याळ’वाले ‘बारामतीकर’ प्रचंड अस्वस्थ जाहले. ‘बहुजनांसी आधारू’ प्रतिमा असणारी राजघराणी कायम आपल्यासोबत घेऊन त्या बळावर राज्यातलं जनमानस ताब्यात ठेवण्याचा प्रयोग आजपावेतो ‘थोरल्या बारामतीकरां’नी यशस्वीरित्या राबविलेला... परंतु आता पश्चिम महाराष्ट्रात त्यांचीच खेळी ‘कमळ’वाल्यांनी त्यांच्यावरच उलटवलेली. आगामी जिल्हा परिषद-नगरपालिका निवडणुकांमध्ये ‘कोल्हापूरच्या राजें’ना राज्यभरात फिरवून बहुजनांची मते आपल्याकडे वळविण्याचा हुकूमी डाव ‘कमळ’वाले टाकतील. तेव्हा ‘थोरले बारामतीकर’ही ‘साताऱ्याचा हुकूमी एक्का’ नक्कीच बाहेर काढतील. कदाचित ‘साताऱ्याच्या राजें’नाही महाराष्ट्रभर फिरवतील... कारण गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत व्यासपीठावर ‘बारामतीकरां’नी ज्या मानानं ‘साताऱ्याच्या राजें’ना बसविलेलं, ते पाहता भविष्यात दोन स्वतंत्र राजघराण्यांच्या वारसदारांना प्रचारात पुढं करून राज्यपातळीवर दोन पक्षांचे नेते ‘शह-काटशह’च्या राजकारणात नक्कीच रंगतील. तेव्हा ‘धाकटया राजें’च्या निगराणीखाली ‘साताऱ्याचं राज्य’ अबाधित ठेवून ‘राज्यभर साम्राज्य’ निर्माण करायला ‘साताऱ्याच्या छत्रपतीं’नी तरी मागंपुढं का पहावं? कारण ‘छत्रपतींचे राज्य व्हावे, ही काळाचीच इच्छा!’ असेल तर किती दिवस वाई, सातारा, कऱ्हाड अन् पाटण फिरत बसणार? का नाही पुणे, मुंबई, नाशिक अन् नागपूर असा अवघा महाराष्ट्र पालथा घालणार? बारामतीचा ‘जाणता राजा’ तसा खूप हुशार.. ‘साताऱ्याचा खराखुरा राजा’ आपल्यासोबत राहिल्याने जेवढा फायदा, त्यापेक्षा विरोधकांसोबत गेला तर तोटाच अधिक, हे त्यांना पुरतं ठावूक. म्हणूनच गेली सात वर्षे पक्षातल्या काही नेत्यांचा ( पुतण्यासह ) कडाडून विरोध असतानाही बारामतीच्या ‘काकां’नी साताऱ्यातल्या ‘थोरल्या राजें’च्याच हातात ‘खासदारकीचं घड्याळ’ बांधलेलं. मिळेल ती संधी साधून आपल्या ‘पुतण्या’वर वेळोवेळी प्रहार करू पाहणाऱ्या या ‘राजें’ना दोनवेळा दिल्लीला पाठविण्याचा निर्णयही घेतलेला; परंतु हे करत असताना अवघ्या महाराष्ट्राला चकित करून टाकणाऱ्या या ‘साताऱ्यातील राजें’च्या व्यक्तिमत्त्वाला शेवटपर्यंत ‘राज्याचं नेतृत्व’ काही बनू न दिलेलं. छत्रपती शिवरायांबद्दल प्रचंड आदर बाळगणारी जुनी पिढी जशी होऊन गेली, त्याहीपेक्षा जास्त शिवरायांबद्दलच्या श्रध्देपोटी झपाटल्यागत वागणारी नवी पिढी आता गावोगावी तयार झालीय... अन् या तरुणाईच्या हातात असलेल्या मोबाईलवर एखादं सरकार बदलविण्याचीही ताकद निर्माण झालीय. अशावेळी साताऱ्यातील शिवघराण्याच्या वारसदारानं एखादी ‘हाक’ द्यावी अन् अवघ्या मराठी मुलुखानं ‘ओ’ देऊ नये, असं कदापिही घडणार नाही. प्रश्न इतकाच की ही ‘हाक’ देण्याचं धाडस ‘साताऱ्याचे राजे’ दाखविणार का? ... अन् ही ‘संधी’ यंदा सोन्याच्या पावलानं चालून आलीय, हे उमजण्याइतपतच्या राजकारणात ‘साताऱ्याचे राजे’ तरबेज नसावेत, असं नक्कीच वाटत नाही. तेव्हा ‘बारामतीकरांचा झेंडा’ घेऊन ‘अश्वमेध’ यज्ञाला ते बाहेर पडणार की भिडे गुरुजींच्या माध्यमातून राज्यभरात ‘स्वतंत्र राजमुद्रा’ उमटविण्याचा प्रयत्न करणार, हाच काय तो कळीचा मुद्दा असू शकतो. मध्यप्रदेशचे माधवराव सिंधीया असो की राजस्थानच्या वसुंधराराजे. त्या-त्या राज्यातील राजघराण्यांनीही आपापल्या प्रदेशाचं नेतृत्व केलेलं; पण महाराष्ट्राच्या इतिहासात इथल्या राजघराण्यांना सत्तेच्या राजकारणामध्ये नेहमीच दुय्यम स्थान मिळालेलं. मात्र, आता परिस्थिती पालटत चाललीय. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात लाखो शिवभक्तांची अलोट गर्दी उसळल्यानंतर काही दिवसांतच ‘कोल्हापूरच्या राजें’ना मानानं ‘खासदारकी’ मिळते, हा नक्कीच योगायोग नसावा. दोन वर्षांपूर्वी रायगडावर ‘नमों’च्या सोहळ्याला ‘साताऱ्याच्या राजें’नी उपस्थिती लावली असती तर कदाचित साताऱ्यात ‘लोकसभे’ला वेगळा इतिहास लिहिला गेला असता अन् याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश ‘विधानसभा मतदारसंघां’वरही कदाचित झाला असता. कारण, ‘नमो’ लाटेविरोधात साताऱ्यात तब्बल पावणेपाच लाखांचं मताधिक्य घेणारे ‘राजे’ अवघ्या महाराष्ट्राला व्यापून टाकू शकले असते, कारण ‘शिवघराण्याचं वलय’ त्यांच्याभोवती असल्यानं ‘भावनेचा चमत्कार’ त्यांच्यासाठी कधीच अशक्य नव्हताच... ‘परकियांचा गंड’ अन् ‘स्वकियांचा इगो’ या दोहोंशी एकाचवेळी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी दोघाांसाठी ‘युध्दनिती’ मात्र वेगवेगळी वापरलेली. कधी कुणावर हल्ला करायचा अन् कुठं कुणाला चुचकारायचं, यात छत्रपती शिवाजी महाराज माहीर होते. त्यांचेच तेरावे वारसदार असणारे सध्याचे ‘साताऱ्याचे खासदार’ त्या मानानं खूप सुदैवी म्हणावे लागतील. कारण त्यांना साताऱ्यात तसा ‘परकियांचा त्रास’ खूप कमी झालेला... परंतु जिल्ह््यात ‘स्वकियांशी युध्द’ करण्यातच त्यांचं निम्मं आयुष्य खर्ची पडलंय, त्याचं काय? ‘साताऱ्याचे थोरले राजे’ अन् ‘बारामतीचे धाकटे पुतणे’ यांच्यातल्या शीतयुध्दाचा आजपावेतो वेळोवेळी भडका उडालेला. ‘थोरल्या काकां’नी मात्र हेतुपुरस्सर या ‘अंतर्गत वादा’कडं दुर्लक्ष केलेलं. ‘सुंठीवाचून खोकला जातोय तर जाऊ द्या की...’ हे ‘काकां’चं म्हणे आवडतं वाक्य. असो... जिल्ह्यातल्या इतर काही नेत्यांनी मात्र ‘धाकट्या बारामतीकरां’साठी ‘साताऱ्याच्या राजें’शी पंगा घेतलेला.. परंतु इथूनच ‘साताऱ्याची राजनिती’ बदललेली. ‘परकियांशी मैत्री’ अन् ‘स्वकियांशी युध्द’ अशी गोंधळात टाकणारी व्यूहरचना केलेली. ‘फलटणच्या राजें’शी खालच्या पातळीवर जाऊन केलेलं पत्रकयुध्दही राज्यभर गाजलेलं. त्यावेळी मात्र ‘बारामतीचे पुतणे’ म्हणे गालातल्या गालात हसलेले. ‘सुंठीवाचून खोकला गेलाऽऽ,’ ही ‘काकां’चीच म्हण म्हणे त्यांनी ‘रिपिट’ केलेली. ‘राजे’ काय करू शकतात? महाराष्ट्रभर ‘स्वत:चा ठसा’ उमटवू शकतात. कोणाचीही भीडभाड न ठेवता ‘आक्रमक’ होऊ शकतात. ‘शिवघराण्याची प्रतिमा’ अधिक उंचावू शकतात. जिल्ह्यतील ‘सर्व नेत्यांना एकत्र’ आणून विकास करू शकतात. ‘पक्षाला अधिकाधिक मोठं’ करू शकतात. ‘राजे’ का करू शकले नाहीत? साताऱ्याच्या स्थानिक राजकारणातच अधिक रस घेतला. पक्षातील ‘स्वकियां’शी लढण्यातच आजपावेतो आक्रमकपणा कामी आला. त्यांच्या ‘खासगी जीवनातल्या गोष्टींची चव्हाट्यावर चर्चा’ करण्यातच आजूबाजूच्या घोळक्यानं धन्यता मानली. पक्षातल्याच स्थानिक नेत्यांवर दरारा ठेवला, मात्र विश्वास गमाविल्यानं सहानुभूती तुटली. पक्षांच्या प्रत्येक कार्यक्रमापासून दूर राहिल्यानं दुरावा वाढला.
-सचिन जवळकोटे