वाई : भाजप सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. तरीही राज्यातील विरोधी पक्ष व वाई तालुक्यातील प्रस्थापित पक्ष कोल्हेकुई करून शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. याला कष्टकरी जनता बळी पडणार नाही. वाई तालुक्यातील प्रस्थापितांचा जलसंधारणातील भ्रष्टाचार बाहेर काढून शेतकºयांच्या हिताचे सरकार कोणते आहे, हे दाखवून देऊ,’ असा इशारा भाजपच्या नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिला.
वाई येथे पक्ष वाढीसाठी आयोजित केलेल्या संघटनात्मक बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे, बापूसाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, उपाध्यक्ष पवन लाखे, सरचिटणीस रामचंद्र सणस, राकेश फुले, यशवंत लेले, रॉकी घाडगे, अशोक नायकवडी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. देवयानी फरांदे पुढे म्हणाल्या, ‘विरोधी पक्ष जाणीव पूर्वक भाजपची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. भाजप त्यांना जशास-तसे उत्तर देईल. वाई तालुक्यात अनेक जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. तरीही त्या पूर्ण झाल्या नाहीत. हा भ्रष्टाचार बाहेर काढून त्याची चौकशी लावण्यासाठी पुढाकार घेणार आहे. महाराष्ट्रात भाजप सरकार स्वच्छ व पारदर्शक कारभार करीत आहे.
वाई तालुक्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी सूचना केल्या असून पक्ष वाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रित येवून भाजप सरकारने राबविलेल्या सर्व योजना तळागळापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहनही आ. फरांदे यांनी केले.