सातारा : जागतिक वारसा प्राप्त झालेल्या कास पठार व तलावाची स्वच्छता करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. याच भावनेतून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. सलग चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकसह तब्बल एक टन कचरा गोळा करून स्वच्छता करू या.. कास जपू या असा संदेश दिला.
जागतिक वारसा स्थळात समावेश झालेल्या कास पठार व तलावाला वर्षभरात लाखो पर्यटक भेटी देतात. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या ठिकाणी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, काचेच्या बाटल्या अशा प्रकारच्या वस्तू तलाव परिसरात फेकल्या जात असल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. परिणामी येथील निसर्ग सौंदर्याला बाध पोहोचत आहे.
कास तलावातून संपूर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, कास परिसर स्वच्छ राहावा व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबात जागृती व्हावी, या उद्देशाने गौरीशंकरच्या सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोनशे विद्यार्थ्यांनी कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.
चार तास श्रमदान करून विद्यार्थ्यांना प्लास्टिक कागद, बाटल्या, पत्रावळ्या, काचेच्या वस्तू, कागद, गुटखा व सिगारेटची मोकळी पाकिटे असा तब्बल एक टन कचरा गोळा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाटही लावली. चिमुकल्यांनी स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत कासचे वैभव फुलविण्याचा निर्धार यावेळी केला़
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजना गोसावी, मीनाक्षी सापते, उज्ज्वला सावंत, प्रिती पवार, राहुल भंडारे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे गौरीशंकर संस्थेचे अध्यक्ष प्रा़ मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी कौतुक केले़पर्यटकांनी कासच्या नैसर्गिक सौंदर्याचामनमुराद आनंद जरूर लुटावा़ परंतु हा आनंद उपभोगताना निसर्गाचे जतन करण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळली तर कासचे सौंदर्य अधिक खुलेल.- श्रीरंग काटेकर,जनसंपर्क अधिकारी, गौरीशंकर