शेखर जाधव वडूज : खटाव तालुका हा क्रांतीकारकांचा तालुका असून चळवळ अथवा लढा उभारणे या तालुक्याला नवीन नाही. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी 'हातसे हात जोडो' अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसचे विचार गावा-गावांत पोहचवणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी केले.येथील फिनीक्स ऑर्गनायझेशन सभागृहात काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते राजूभाई मुलाणी, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, डॉ.महेश गुरव, सत्यवान कमाने, पांडूरंग खाडे, आनंदा साठे, राहुल सजगणे आदीची उपस्थिती होती.यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेला आधार देत व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज असून गाव तेथे शाखा उभारून काँग्रस विचारसरणीची पाळेमुळे घट्ट करणार आहे. भारत जोडो यात्रेतील सभेमुळे मोदी सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळे खोटे आरोप करत खासदार राहूल गांधी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे म्हणाले.राष्ट्रीय कॉग्रेस माण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. महेश गुरव म्हणाले की, खटाव - माण तालुक्यात सध्या झळकणारे, विकासकामांचे कोटींची उड्डाने घेणारे, प्रसिद्धीचे माँडर्न सिटीसारखे फ्लेक्स बोर्ड यापूर्वी देखील पाहिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी मंजूर केलेली कामेही या चमकोगिरी भाजपच्या आमदारांनी प्लेक्स बोर्डवर आणून त्यांचे ही श्रेय लाटले. त्यामुळे यापुढील काळात नौटंकी करणाऱ्या आमदाराची डाळ येथील जनता शिजू देणार नाही. तालुकाघ्यक्ष संतोष गोडसे यांनी तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर लवकरच जनआंदालने उभारणार असल्याचे सांगितले. सत्यवान कमाने यांनी प्रास्तावीक, विजय शिंदे यांनी सुत्रसंचालन तर युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी सरपंच सदाशिव खाडे, जोतिराम बागल, आकाराम खाडे, परेश जाधव, राजेंद्र माने, निलेश घार्गे, सयाजी सुर्वे, राम कुलकर्णी आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपची हुकूमशाही मोडीत काढूया, रणजितसिंह देशमुख यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:10 PM